आदर्श शिक्षक, जीवनगौरव आणि आदर्श पत्रकारिता पुरस्कारांनी सन्मान; संपादक आबासाहेब शिरसाट व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
सारथी महाराष्ट्राचा / प्रतिनिधी
पुणे : अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील नूतन मराठी प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक, सुप्रसिद्ध निवेदक, पत्रकार तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य प्रवक्ते अशोक विश्वनाथ सूर्यवंशी यांना लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त तीन प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात सूर्यवंशी यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६, राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार २०२६ आणि राज्यस्तरीय आदर्श पत्रकारिता पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्याध्यक्ष दत्ता गाडगे, दैनिक लोक परिवर्तनचे संपादक आबासाहेब शिरसाट तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडला.
शिक्षण, पत्रकारिता, निवेदन आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या अशोक सूर्यवंशी यांनी आपल्या कार्यातून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यासोबतच सामाजिक जनजागृती आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य ते करीत आहेत.
एक कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक म्हणून शैक्षणिक क्षेत्रातील योगदान, प्रभावी निवेदक म्हणून सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांतील सहभाग आणि पत्रकार म्हणून जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी केलेले कार्य याची दखल घेत त्यांना या तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
एकाच व्यासपीठावर तीन पुरस्कारांचा बहुमान
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार, विविध क्षेत्रांतील प्रदीर्घ कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार आणि पत्रकारितेतील योगदानाबद्दल आदर्श पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याने अशोक सूर्यवंशी यांच्या कार्याचा एकाच वेळी तीन राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव झाला आहे.
या तिहेरी सन्मानाबद्दल शैक्षणिक, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर, शिक्षकवृंद, पत्रकार बांधव, मित्रपरिवार आणि हितचिंतकांकडून अशोक सूर्यवंशी यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर अशोक सूर्यवंशी यांनी लोक परिवर्तन वृत्तपत्र समूहाचे आभार मानले. मिळालेला हा सन्मान भविष्यात शैक्षणिक, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्यासाठी प्रेरणादायी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.








