राष्ट्रीय महामार्ग क्र. १६१अ वरील प्रलंबित कामांबाबत राज ठाकूर व अपिल बेलखोडे यांचे आंदोलन; नवरात्रापूर्वी कामे पूर्ण करण्याची मागणी
श्रीक्षेत्र माहूर : माहूर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१अ वरील विविध विकासकामे गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली असून, ही कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार राज ठाकूर आणि अपिल बेलखोडे यांनी दि. २८ सप्टेंबर २०२६ पासून माहूर येथील दत्त चौक (टी-पॉईंट) येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.
धनोडा ते कोठारी या राष्ट्रीय महामार्गावरील काही कामे पूर्ण झाली असली तरी अनेक महत्त्वाची कामे अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे नागरिकांसह माहूरला येणारे भाविक आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पथदिवे बंद; रस्त्याच्या कडेला पेव्हर ब्लॉकचे काम अपूर्ण
माहूर शहरातील न्यायालय ते ग्रामीण रुग्णालय या मार्गावरील सर्व पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी या मार्गावर अंधाराचे साम्राज्य निर्माण होते. त्याचा त्रास स्थानिक नागरिक तसेच भाविकांना सहन करावा लागत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे.
तसेच दत्त चौक (टी-पॉईंट) ते ग्रामीण रुग्णालय या मार्गाच्या दोन्ही बाजूंना पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पादचाऱ्यांना या मार्गावरून चालताना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
दुभाजकाचे सुशोभीकरणही रखडले
राष्ट्रीय महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या दुभाजकाचे सुशोभीकरणाचे कामही अपूर्ण आहे. दुभाजकावर शोभेची झाडे लावण्यात आलेली नसून संरक्षक जाळीही बसविण्यात आलेली नसल्याने अपघातांचा धोका निर्माण होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
धनोडा-माहूर नवीन पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार?
पैनगंगा नदीवरील धनोडा-माहूर नवीन पूल अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नसल्याने प्रवासी आणि भाविकांना जुन्या पुलावरून प्रवास करावा लागत आहे. जुन्या पुलावर मोठमोठे खड्डे पडल्याने अपघाताचा धोका वाढला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नवरात्रापूर्वी कामे पूर्ण करण्याची मागणी
माहूर हे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या श्री रेणुकामाता मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. तसेच भगवान दत्तात्रेयांचे जन्मस्थान, अनसूया माता मंदिर, कैलास टेकडी, बाबा सोनापीर दर्गा, शेख फरीद धबधबा, पांडव लेणी, रामगड किल्ला आणि मातृतीर्थ यांसारखी धार्मिक व पर्यटनस्थळे येथे आहेत. त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने भाविक व पर्यटक माहूरला येतात.
नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महामार्गावरील सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत, अशी मागणी राज ठाकूर व अपिल बेलखोडे यांनी केली आहे.
प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन सुरूच ठेवण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. रखडलेल्या कामांबाबत प्रशासन कोणती भूमिका घेते आणि संबंधित कामांना प्रत्यक्ष गती कधी मिळते, याकडे माहूरकरांचे लक्ष लागले आहे.







