सारोळा शाळेतील तब्बल ५९ गुणवंत विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिनी होणार गौरव..!
जामखेड (प्रतिनिधी) : “गुणवंत विद्यार्थी हेच भारताचे उज्ज्वल भविष्य आहे,” या उदात्त हेतूने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सारोळा येथील माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक आदरणीय भीमराव गोविंदराव सांगळे साहेब यांनी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या प्रोत्साहनासाठी ११ हजार रुपयांचे बक्षीस दिले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता ४ थी, ५ वी, ७ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच NMMS परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या तब्बल ५९ गुणवंत विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर गौरव करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्या शैक्षणिक वाटचालीला प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
सांगळे साहेबांच्या वतीने दरवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी ११ हजार रुपयांचे बक्षीस दिले जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच शाळेच्या सर्वांगीण विकासासाठीही त्यांनी नेहमीच भरीव योगदान दिले आहे. यापूर्वी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने शाळेसाठी तब्बल एक लाख दोन हजार सहाशे एक रुपयांची देणगी देऊन त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
सारोळा शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी सातत्याने मदतीचा हात देणाऱ्या सांगळे साहेबांच्या दातृत्वाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये अधिक मेहनत घेऊन यश संपादन करण्याची प्रेरणा निर्माण होत असून, गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचे काम या माध्यमातून होत आहे.
या दातृत्वाबद्दल सारोळा गावच्या सरपंच रितूताई काशीद, अजयदादा काशीद, उपसरपंच हर्षद मुळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश मुळे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जगदाळे, ग्रेड मुख्याध्यापक संदीप भालसिंग सर, सर्व शिक्षक, पालक,ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्या वतीने आदरणीय भीमराव सांगळे साहेबांचे मनःपूर्वक शतशः आभार व्यक्त करण्यात आले.









