विद्यार्थ्यांनी घेतला थोर राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा व कार्याचा प्रेरणादायी परिचय
साळवा, ता. मौदा, जि. नागपूर | दि. १ ऑगस्ट
ग्रामीण विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, साळवा, ता. मौदा, जि. नागपूर येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. आर. पेंडाम होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ शिक्षक श्री. राजेश ढोके व जी. एस. फागणे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या जीवनकार्यावर मनोगते व भाषणे सादर केली.
लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यलढ्यात जनजागृती करून भारतीय जनतेमध्ये स्वराज्याची भावना निर्माण केली. तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक जाणिवेतून कष्टकरी व वंचित समाजाच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडली. त्यांच्या संघर्षमय जीवनातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखावी, असे मार्गदर्शन मान्यवरांनी केले.
या कार्यक्रमास इयत्ता ५ वी ते १२ वीचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. राष्ट्रप्रेम, सामाजिक बांधिलकी आणि समतेचा संदेश देत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.








