चिपळूण तालुक्यातील वीर–देवपाट मार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत होत आहे. मोठमोठ्या खड्ड्यांनी रस्ता अक्षरशः विद्रूप झाला असून पावसामुळे त्यात पाणी साचत असल्याने वाहनचालक, शाळकरी विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रकार घडत असून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांचा आरोप आहे की, प्रत्येक निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्षांचे नेते आणि लोकप्रतिनिधी गावात येऊन रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मोठमोठी आश्वासने देतात. मात्र निवडणूक संपताच ही आश्वासने हवेत विरतात आणि रस्त्याची दुरवस्था कायम राहते. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
ग्रामस्थांनी अनेक वेळा संबंधित प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि लोकप्रतिनिधींकडे लेखी व तोंडी पाठपुरावा केला. तरीही कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नाही. या रस्त्यावरून दररोज शेकडो नागरिक, विद्यार्थी आणि शेतकरी प्रवास करत असल्याने तातडीने दर्जेदार डांबरीकरण व दुरुस्तीची आवश्यकता आहे.
“आता आश्वासने नकोत, प्रत्यक्ष काम हवे,” अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. येत्या काही दिवसांत रस्त्याच्या कामाला सुरुवात न झाल्यास ग्रामस्थ लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात आले.
वीर–देवपाटसारख्या ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार रस्त्याचा हक्क मिळावा, यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी एकमुखी मागणी होत आहे.









