गोविंदराव वंजारी फाउंडेशनचा भव्य रोजगार मेळावा उत्साहात; ५० हून अधिक नामांकित कंपन्यांचा सहभाग
|नितेश गट्टीवार
गडचिरोली,( चामोर्शी)दि.१ जूलै :
गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीने गडचिरोली येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा आमदार अभिजीतदादा वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या मेळाव्यात ५० हून अधिक नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवून हजारो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या.
या मेळाव्यात प्रमुख उपस्थिती म्हणून महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी युवकांना मार्गदर्शन करताना, “रोजगाराच्या संधी वारंवार मिळत नाहीत. त्यामुळे प्रत्येक युवकाने मिळालेल्या संधीचे सोनं करून कौशल्य, आत्मविश्वास आणि सातत्याच्या बळावर स्वतःचे उज्ज्वल भविष्य घडवावे,” असे आवाहन केले.
कार्यक्रमाला आमदार रामदासजी मसराम, जिल्हा उपाध्यक्ष समशेरखान पठाण, सरचिटणीस प्रभाकरजी वासेकर, ॲड. दुष्यंत नामदेव किरसान, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष माधव गावड, धनपाल मिसार, अजय लोंडे, जावेद खान, स्वप्नील बेहरे, विजय राऊत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
रोजगार मेळाव्यात विविध उद्योग व सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी मुलाखती घेऊन पात्र उमेदवारांची त्वरित निवड केली. निवड झालेल्या युवक-युवतींचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.
शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, युवकांना योग्य मार्गदर्शन करणे आणि त्यांना स्वावलंबी बनविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
मोठ्या संख्येने युवक-युवतींच्या उपस्थितीमुळे रोजगार मेळाव्याला उत्साहाचे वातावरण लाभले असून, हा उपक्रम गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांसाठी आशेचा किरण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.








