सांगलीत रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत कचरा नदीपात्रात पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न
सांगली प्रतिनिधी : शहरातील कृष्णा नदी आणि शेरीनाल्याच्या परिसरात मृत कोंबड्या तसेच मांसजन्य कचरा टाकला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. रात्रीच्या वेळी हा प्रकार सुरू असल्याने नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
शहरातील काही भागांतून कोंबड्यांचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींकडून मृत कोंबड्या व इतर टाकाऊ अवशेष योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता नदीपात्र आणि नाल्यांमध्ये टाकले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होण्याबरोबरच पाण्याचे प्रदूषण वाढण्याची शक्यता आहे.
विशेष म्हणजे, रात्रीच्या सुमारास नदी परिसरात अशा प्रकारे कचरा टाकला जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर या प्रकाराची पाहणी करण्यात आली. यामध्ये नदीपात्रात मृत कोंबड्या आढळून आल्या. नदीकाठचा परिसर हा नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा असून अशा प्रकारामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कृष्णा नदीच्या पाण्याचा विविध कारणांसाठी वापर केला जात असल्याने नदीपात्रात जैविक कचरा टाकणे हा चिंतेचा विषय आहे. मृत कोंबड्या व मांसाचे अवशेष पाण्यात कुजल्याने जलप्रदूषण वाढण्यासोबतच रोगराईचा धोका निर्माण होऊ शकतो.
दरम्यान, नदी व नाल्यांमध्ये कचरा टाकणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने नियमित तपासणी करावी. तसेच संबंधित व्यावसायिकांना कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत स्पष्ट सूचना देऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी केवळ स्वच्छता मोहीम न राबवता प्रदूषण करणाऱ्यांवर थेट कारवाई करण्याची गरज आहे. आता प्रशासन या प्रकाराची दखल घेऊन काय कारवाई करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.








