माहूर : प्रतिनिधी
किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा विकासपुरुष श्री. भीमराव केराम यांच्या प्रयत्नांना यश आले असून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) माहूर आगाराला ‘महिला सक्षम’ योजनेअंतर्गत पाच नवीन जिजाऊ बसेस प्राप्त झाल्या आहेत. या नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा माहूरगड येथे आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते उत्साहात पार पडला.
माहूर आगाराला मिळालेल्या या नवीन बसेसमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सुविधाजनक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः महिला प्रवाशांसाठी या बसेस उपयुक्त ठरणार असून ग्रामीण व दुर्गम भागातील प्रवासी वाहतुकीलाही यामुळे चालना मिळणार आहे.
किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या सार्वजनिक वाहतुकीशी संबंधित गरजा लक्षात घेऊन आमदार भीमराव केराम यांनी केलेल्या प्रयत्नांतून या बसेस उपलब्ध झाल्याचे सांगण्यात आले. नवीन बसेस सेवेत दाखल झाल्याने माहूर आगाराच्या वाहतूक व्यवस्थेत आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









