वीज तारांमधील शॉर्टसर्किटमुळे चाऱ्याचे नुकसान; शेतकऱ्याला आर्थिक मदत, पंचनामा करून भरपाई देण्याची प्रशासनाकडे मागणी
कुसूर (ता. येवला) | प्रतिनिधी
आधीच दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता वीज अपघातामुळे नवे संकट उभे राहिले आहे. कुसूर येथील शेतकरी दौलत गायकवाड यांनी विकत घेतलेल्या चाऱ्याचे विजेच्या तारांमध्ये झालेल्या शॉर्टसर्किटमुळे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच संभाजी पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्याची विचारपूस केली. तसेच त्यांना रोख स्वरूपात आर्थिक मदत देत या कठीण प्रसंगी आधार दिला.
यावेळी संभाजी पवार यांनी तहसीलदार तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा करून त्यांना शासकीय मदत व योग्य नुकसानभरपाई मिळावी, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती त्यांनी केली.
आधीच दुष्काळामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत विकत घेतलेल्या चाऱ्याचे नुकसान झाल्याने दौलत गायकवाड यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्याला तातडीने मदत करणे गरजेचे असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी कांतीलाल साळवे, बाजार समितीचे माजी उपसभापती बापूसाहेब गायकवाड, दिलीपराव मेंगाळ, पोलीस पाटील मनोहर गायकवाड, सोन्याबापू पवार, दत्तू गायकवाड यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
दुष्काळाच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अशा आपत्तीच्या काळात मदतीचा हात मिळणे ही काळाची गरज आहे. प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा करून संबंधित शेतकऱ्याला तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.











