पालम – तालुक्यातील नाव्हा गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने नियमित व शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गावातील नागरिकांना अनेक दिवसांपासून पुरेशा प्रमाणात पिण्याचे पाणी मिळत नसल्याने महिला, लहान मुले, वृद्ध आणि सर्वसामान्य ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. गावातील बोअरवेल, विहिरी आदी जलस्रोत कोरडे पडल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. पाणीपुरवठा योजना, पाईपलाईन, मोटारी आणि इतर यंत्रणांची तातडीने तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनी गावातील पाणीपुरवठा व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी करून नियमित वेळापत्रकानुसार पाणीपुरवठा करावा, आवश्यक असल्यास टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच भविष्यात पाणीटंचाई टाळण्यासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करून नवीन जलस्रोत, पाईपलाईन आणि साठवण क्षमतेची कामे मंजूर करावीत, अशी मागणी केली आहे.
निवेदनावर उपसरपंच वैशाली पांडुरंग मुलगीर आणि ग्रामपंचायत सदस्य शिवकन्या सुनील तिगोटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.










