शाळांमध्ये ध्वजारोहणासह देशभक्तीपर कार्यक्रम; विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थांची मोठी उपस्थिती
सुरेगाव गंगा, दि. १५ ऑगस्ट २०२६ : भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन सुरेगाव गंगा येथे उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुरेगाव गंगा तसेच सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय, व ग्रामपंचायत सुरेगाव/बोरगाव येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, भाषणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.
कार्यक्रमास गावातील वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या प्रगतीसाठी जबाबदार नागरिक म्हणून योगदान देण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. संपूर्ण परिसर “भारत माता की जय” आणि “वंदे मातरम्”च्या घोषणांनी दुमदुमून गेला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या प्रसंगी शाळा परिसरात स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
— पत्रकार गोविंद माळवे
सुरेगाव गंगा











