कवठे महांकाळ / तालुका प्रतिनिधी : कवठे महांकाळ तालुक्यातील नागरिक व शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे राज्याध्यक्ष व महामार्ग शेतकरी, शेतमजूर आघाडीचे नेते भाई दिगंबर कांबळे यांनी तहसील कार्यालयासमोर पुकारलेल्या आंदोलनाला मोठे राजकीय बळ मिळाले आहे.
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तासगाव-कवठे महांकाळचे आमदार रोहित दादा पाटील राष्ट्रवादी पक्षाचे नेते हायुम सावणुरकर यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. नॅशनल काँग्रेस पार्टीचे कवठे महांकाळ तालुका अध्यक्ष अविराजे शिंदे आणि दिगंबर लोंढे,चैतन्य पाटील व काँग्रेस च्या असंख्य कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देऊन भाई दिगंबर कांबळे यांना पाठिंबा दर्शवला.
यावेळी भाई कांबळे यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात तालुक्यातील गंभीर प्रश्न मांडले आहेत.
प्रमुख मागण्या अशा:
१) शिरढोण येथील अग्रणी नदीवरील ब्रिज संपूर्ण जीर्ण झाला असून निकृष्ट दर्जाचे खड्डे पडले आहेत, त्याची तातडीने दुरुस्ती करून डांबरीकरण करावे.
२) शिरढोण येथील अग्रणी नदीवरील ब्रीज दोन्ही बाजूला नवीन सर्व्हिस रोड पूल तातडीने बांधण्यात यावा.
३) कवठे महांकाळ तालुक्यात कुठलीही मागणी न करता वीज वितरण कंपनीने जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवले असून, ते तात्काळ बंद करून जुने मीटरच चालू ठेवावेत.
४) तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले असून, तातडीने पेरणी झालेल्या सर्व भागांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत द्यावी.
शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी शेकाप नेहमीच रस्त्यावर उतरेल आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा भाई दिगंबर कांबळे यांनी दिला.
या आंदोलनाला नॅशनल काँग्रेस पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष सारख्या मोठ्या पक्षाने पाठिंबा दिल्याने प्रशासनावर दबाव वाढला असून, या प्रश्नी तहसील प्रशासन लवकरच सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







