दिड महिन्यापासून पावसाची दडी; बैल सजावटीचे साहित्य बाजारात, मात्र शेतकऱ्यांच्या खिशात आर्थिक चणचण
पाथरी (प्रतिनिधी) : अहमद अन्सारी पाथरी परभणी
शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा आणि पारंपरिक सण म्हणून ओळखला जाणारा पोळा सण येत्या १० सप्टेंबर रोजी साजरा होणार आहे. पोळ्यानिमित्त बैलांना सजविण्यासाठी विविध प्रकारचे साहित्य बाजारात दाखल झाले असून दुकानदारांनी रंगीबेरंगी बैल सजावटीच्या वस्तूंनी दुकाने सजविली आहेत. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने पोळा सणावरही दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.
खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने महागडी सोयाबीन व कापूस बियाणे खरेदी करून पेरणी केली. त्यानंतर पिकांचे संगोपन करण्यासाठी महागडी खते, औषधे व कीटकनाशकांची फवारणी केली. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने पिकांची अवस्था चिंताजनक बनली आहे. अनेक भागांत पिकांना पाण्याची नितांत गरज असताना अपेक्षित पाऊस झालेला नाही.
पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या उत्पादनाच्या आशेवर मोठा परिणाम झाला आहे. एकीकडे पेरणी, बियाणे, खते व औषधांवर मोठा खर्च झाला आहे, तर दुसरीकडे पिकांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे यंदाचा पोळा सण नेहमीच्या उत्साहात कसा साजरा करायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
बाजारात सजावटीचे साहित्य, मात्र ग्राहकांची प्रतीक्षा
पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत बैलांच्या सजावटीचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. बैलांच्या गळ्यातील घुंगरू, रंगीबेरंगी माळा, दोर, झुली, शिंगांना लावण्यात येणाऱ्या विविध सजावटीच्या वस्तू, रंग तसेच इतर साहित्य दुकानदारांनी दुकानाबाहेर मांडले आहे. बाजारपेठ रंगीबेरंगी साहित्याने सजली असली तरी शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणींमुळे अपेक्षित खरेदी होईल का, याबाबत व्यापाऱ्यांमध्येही संभ्रम आहे.
पोळा हा केवळ सण नसून शेतकरी आणि बैलांच्या नात्याचा सन्मान करणारा दिवस आहे. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांची पूजा करून त्यांना सजविले जाते. मात्र यंदा पावसाअभावी शेती व्यवसायच अडचणीत आल्याने या सणाच्या आनंदावर आर्थिक संकटाची छाया पडली आहे.
शासनाने तातडीने मदतीचा हात द्यावा
पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर होत आहे. त्यामुळे शासनाने तालुक्यातील पावसाची परिस्थिती व पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, तसेच पीकविमा व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
पाऊस पडेल, पिके वाचतील आणि पोळा सण आनंदात साजरा करता येईल, या आशेने बळीराजा अद्यापही आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.








