(बांबवडे प्रतिनिधी):
विद्यामंदिर गुजर-वाडी शाळेचे ध्येयवादी व उपक्रमशील अध्यापक विठ्ठल वसंत पाटील सर यांना सन २०२६ चा जिल्हा परिषदेचा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ जाहीर झाला आहे. शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले परिश्रम आणि विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी यांमुळे त्यांना या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे.
पिशवी (ता. शाहूवाडी) गावचे सुपुत्र असलेले विठ्ठल पाटील सर यांनी गुजर-वाडी शाळेमध्ये अध्यापनाचे कार्य करताना शैक्षणिक गुणवत्तेसोबतच विद्यार्थ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक कलागुणांना वाव देण्याचे मोठे कार्य केले आहे. त्यांच्या या यशाबद्दल शिक्षण क्षेत्रातून तसेच संपूर्ण शाहूवाडी तालुक्यातून कौतुक होत आहे.
पुरस्कार जाहीर झाल्याचे समजताच शिक्षक संघ परिवार शाहूवाडी, सहकारी शिक्षक, शिक्षणप्रेमी, ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना सर्वांकडून मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत.

