
आमदार संजय दरेकर यांच्या हस्ते मारेगावात कास्तकारांना सौरऊर्जेवर चालणाऱ्या सुरक्षा यंत्रणेचे वितरण
मारेगाव (प्रतिनिधी) :
मोकाट जनावरे तसेच जंगली प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या पिकांचे व शेत परिसराचे संरक्षण व्हावे, यासाठी मारेगाव शहरातील सुविधा मंगल कार्यालय येथे कास्तकारांना आधुनिक यंत्रसामग्रीचे वाटप करण्यात आले. वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय भाऊ दरेकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना स्वतःच्या हाताने या यंत्रसामग्रीचे वितरण करण्यात आले.
मारेगाव, झरी, केळापूर आणि राळेगाव या भागांमध्ये कास्तकारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अशा प्रकारच्या यंत्रसामग्री वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. मारेगाव येथील सुविधा मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात शेताभोवती फिरणारा सौरऊर्जेवर चालणारा सुरक्षा दिवा तसेच त्यासाठी आवश्यक सोलर प्लेट व इतर साहित्य कास्तकारांना प्रदान करण्यात आले.
शेत परिसरात रात्रीच्या वेळी मोकाट जनावरे तसेच जंगली प्राण्यांपासून पिकांचे नुकसान होऊ नये आणि शेतकऱ्यांना सुरक्षितता मिळावी, या उद्देशाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. सौरऊर्जेवर चालणारी ही यंत्रणा शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शिवसेना कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या उपक्रमांतर्गत सुमारे २ हजार ते २ हजार ५०० नागरिकांना/कास्तकारांना यंत्रसामग्रीचे वाटप करण्यात आले आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कास्तकारांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मोकाट जनावरे व जंगली प्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यावर उपाययोजना करण्याचा हा प्रयत्न महत्त्वपूर्ण मानला जात आहे. यंत्रसामग्री मिळाल्याबद्दल तालुक्यातील कास्तकारांनी आमदार संजय दरेकर यांचे आभार व्यक्त केले.
