
शेतकऱ्यांना हेक्टरी ८० हजार रुपये अनुदानासह विविध मागण्यांसाठी उदगीर तहसीलदारांना निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
लातूर :
संपूर्ण मराठवाड्यात पावसातील अनिश्चितता व शेतीसमोरील संकटाची दखल घेऊन मराठवाडा कोरड्या दुष्काळग्रस्त भाग म्हणून जाहीर करावा, या प्रमुख मागणीसाठी संभाजी ब्रिगेडच्या लातूर जिल्हा व तालुका कार्यकारिणी तसेच शेतकऱ्यांच्या वतीने मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी उदगीर तहसीलदारांमार्फत राज्याचे कृषिमंत्री तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक व प्रशासकीय मदत देण्याच्या विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
संभाजी ब्रिगेड व शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
१. संपूर्ण मराठवाडा कोरडा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा.
२. बियाणे, खते व फवारणीसाठी झालेल्या खर्चापोटी हेक्टरी ८० हजार रुपये अनुदान द्यावे.
३. जनावरांच्या चारा व्यवस्थापनासाठी प्रतिपशू दरमहा ३ हजार रुपये मदत द्यावी.
४. शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शैक्षणिक शुल्क माफ करून विद्यार्थ्यांना एसटी बसचा पास मोफत द्यावा.
५. शेतकऱ्यांच्या घरगुती वीज बिलात माफी द्यावी.
६. आगामी रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत उपलब्ध करून द्यावीत.
७. एमपीएससी परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर फेरपरीक्षा घेण्यात यावी.
८. विविध शासकीय कामे सुरू करून स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून द्यावा.
९. पीक विम्याची रक्कम मंजूर करून शेतकऱ्यांना शेती अवजारे मोफत उपलब्ध करून द्यावीत.
१०. पीक कर्जाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करण्यात यावी.
शेतकऱ्यांची सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास संभाजी ब्रिगेड आणि शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे लातूर जिल्हाध्यक्ष शिवश्री राजकुमार माने, जिल्हा उपाध्यक्ष शिवश्री उत्तमरावजी फड, जिल्हा संघटक शिवश्री राम रावणगावे, तालुका उपाध्यक्ष शिवश्री मनेश पाटील, ऑटो युनियनचे अध्यक्ष शिवश्री मोबीन सय्यद, तसेच शिवश्री उमाकांत कोठारे, शिवश्री सुलेमान, शिवश्री ज्ञानेश्वर भांगे, शिवश्री जी. पी. तरवडे, शिवश्री सुरेबा बिरादार, शिवश्री चंनाबस संभाळे, शिवश्री करण बिरादार यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
