
उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांचे गणेश मंडळांना आवाहन
माहूर : प्रतिनिधी
गणेशोत्सव हा आपल्या संस्कृती आणि परंपरेचा उत्सव आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी डीजेचा आग्रह न धरता पारंपरिक वाद्यांचा वापर करून उत्सव साजरा करावा. तसेच संबंधित विभागांच्या आवश्यक त्या परवानग्या घेऊन गणेशोत्सव आनंदात, उत्साहात आणि शांततेत साजरा करावा, असे आवाहन माहूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरण भोंडवे यांनी केले.
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माहूर पोलीस ठाण्याच्या वतीने मंगळवार, दि. ९ सप्टेंबर रोजी बालाजी मंगलम येथे शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करताना भोंडवे बोलत होते.
बैठकीस निवासी नायब तहसीलदार श्रीमती अरुणा सूर्यवंशी, नगराध्यक्ष फिरोज दोसानी, पोलीस निरीक्षक देविदास चोपडे, उपनगराध्यक्ष नाना लाड, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता प्रीतम वसमतकर, नगरपंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक गजलवाड आणि नगर अभियंता विशाल ढोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मिरवणूक मार्ग, विद्युत व्यवस्था व विसर्जनस्थळांच्या प्रश्नांवर चर्चा
बैठकीत माहूर शहर व ग्रामीण भागातील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गातील अडथळे, विद्युत व्यवस्था, विसर्जनस्थळी आवश्यक उपाययोजना तसेच डीजे वापराच्या परवानगीसंदर्भातील अडचणी प्रशासनासमोर मांडल्या.
यावेळी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांनी डीजे परवानगीचा विषय वगळता मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करणे, विद्युत व्यवस्था सुरळीत ठेवणे तसेच विसर्जनस्थळी आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्व गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे. ध्वनिप्रदूषण टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे तसेच सामाजिक सलोखा कायम ठेवत गणेशोत्सव उत्साहात साजरा करावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
बैठकीस पत्रकार वसंत कपाटे, नंदकुमार जोशी, विजय आमले, जयकुमार अडकीने, मनोज कीर्तने, राज ठाकूर, अनिल माडपेलीवार, विकास कपाटे, विनोद सूर्यवंशी, सुरेश राठोड, मनोज जाधव, पद्मा गिऱ्हे, सुरेखा तळणकर यांच्यासह विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, पोलीस पाटील आणि नागरिक उपस्थित होते.
