शेतीपंपाचे भारनियमन तात्काळ बंद करून वाडी-वस्तीवरील वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी
वडूज : खटाव तालुका प्रतिनिधी नितीन राठोड
शेतकरी तसेच वाडी-वस्तीवरील नागरिकांच्या वीज समस्यांकडे महावितरणचे लक्ष वेधण्यासाठी आज वडूज येथील महावितरण उपविभागीय कार्यालयात निवेदन देण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतीपंपासाठी करण्यात येणारे भारनियमन (लोडशेडिंग) तात्काळ बंद करावे आणि वाडी-वस्तीवरील वीजपुरवठा सुरळीत व नियमित करावा, अशी प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
शेती मोठ्या प्रमाणात वीजपुरवठ्यावर अवलंबून असताना वारंवार होणारे भारनियमन, वीजपुरवठ्यातील खंडितपणा आणि अनियमिततेमुळे शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शेतीपंपांना आवश्यक वीज वेळेत उपलब्ध न झाल्याने शेतीच्या कामांवरही परिणाम होत असल्याची भूमिका शेतकरी बांधवांनी मांडली.
वाडी-वस्तीवरील नागरिकांनाही नियमित वीजपुरवठा मिळावा, यासाठी महावितरण प्रशासनाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या हक्काच्या विजेचा प्रश्न तातडीने सोडवून प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी आग्रही भूमिका यावेळी मांडण्यात आली.
या वेळी मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि वीज प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सातत्याने आवाज उठवत राहू, अशी भूमिका उपस्थितांनी व्यक्त केली.







