FDAची धडक कारवाई; तब्बल १७ हजार किलोहून अधिक दुग्धजन्य पदार्थ जप्त
पुणे : प्रतिनिधी
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दुग्धजन्य पदार्थांच्या साठ्यावर धडक कारवाई केली आहे. बुधवार पेठ आणि शुक्रवार पेठ परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर संशयित भेसळयुक्त खवा आणि पनीर जप्त करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, या कारवाईत सुमारे ४,६०० किलो खवा आणि १२,५०० किलो पनीर, असा एकूण १७,१०० किलो दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. या मालाची अंदाजे किंमत ३८ ते ३९ लाख रुपये असल्याचे वृत्त आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खवा बार्शी येथून तर पनीरचा साठा कर्नाटकातून पुण्यात आणण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी संशयित पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.
अंतिम अहवालानंतरच पदार्थांची गुणवत्ता आणि त्यामध्ये भेसळ आहे किंवा नाही, याबाबत अधिकृत निष्कर्ष स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्या हे पदार्थ ‘संशयित भेसळयुक्त’ म्हणून जप्त करण्यात आले आहेत.
सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर खवा, पनीर, मिठाई आणि इतर दुग्धजन्य पदार्थांची मागणी वाढते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खाद्यपदार्थ खरेदी करताना विश्वासार्ह विक्रेत्यांकडूनच पदार्थ खरेदी करावेत आणि संशयास्पद गुणवत्ता आढळल्यास संबंधित यंत्रणेकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
— पत्रकार, अशोक चव्हाण
सारथी महाराष्ट्राचा
पुणे जिल्हा प्रतिनिधी





