तरुण, महिला, पोलीस कर्मचारी व सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची उपस्थिती; बदलत्या काळातही बैलांप्रती कृतज्ञतेची परंपरा कायम
जळकोट : प्रतिनिधी
जळकोट शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही बैलपोळा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील तरुण, नागरिक, महिला, पोलीस कर्मचारी तसेच नगरपंचायतीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व नगरपंचायत सदस्य आणि विविध पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्तेही उत्साहाने सहभागी झाले.
बदलत्या काळानुसार शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढल्याने बैलजोड्यांची संख्या कमी झाली असून ट्रॅक्टरने शेतीच्या कामात बैलांची जागा घेतली आहे. त्यामुळे बैलपोळ्याचे पारंपरिक स्वरूप काही प्रमाणात बदलत असले, तरी शेतकऱ्यांच्या जीवनात बैलांप्रती असलेला जिव्हाळा, स्नेह आणि कृतज्ञतेची भावना आजही कायम असल्याचे जळकोट शहरातील पोळा उत्सवातून दिसून आले.
यावेळी शहरातील माजी नगराध्यक्षांच्या वतीने जनावरांना पेढे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून मुक्या जनावरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कार्यक्रमास सोमेश्वर सोपा, दत्ता शेळके, किशन बोधलेरॉयवार यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि गणेश मंडळांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैलपोळा हा केवळ पारंपरिक सण नसून शेतकरी आणि बैल यांच्यातील अतूट नात्याचे प्रतीक आहे. आधुनिक शेतीच्या काळातही ही परंपरा जपण्यासाठी जळकोटकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.







