तालुक्यातील बोरगाव येथे एका दुर्दैवी आगीच्या दुर्घटनेत नाथ जोगी परिवाराची तीन घरे जळून खाक झाली असून, यामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पोळा सणाचा आनंद सर्वत्र सुरू असतानाच या कुटुंबावर मोठे संकट ओढवले. या घटनेची माहिती मिळताच आमदार अमित सुभाषराव झनक यांनी सणाचा दिवस बाजूला सारत थेट बोरगाव गाठले आणि घटनास्थळी भेट दिली.
यावेळी आ. अमित झनक यांनी पीडित कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करत त्यांना धीर दिला. संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी उभे राहण्याची आपली बांधिलकी जपताना त्यांनी पीडित परिवारास तातडीने मदतीचा हात दिला. सणाच्या दिवशी स्वतःचा आनंद बाजूला ठेवून गोरगरिबांच्या दुःखात सहभागी होणाऱ्या आमदारांच्या या संवेदनशील स्वभावाचे ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.
घटनास्थळाची पाहणी करून प्रशासकीय यंत्रणेला मदतीबाबत तातडीने निर्देश देण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत बीडीओ मितेश पाटील, ग्रामसेवक मोहन वानखेडे, प्रकाश मामा आंभोरे, माजी सरपंच वसंतराव लांडकर, नारायण गारडे सर, लांडकर सर, सदाशिव लांडकर, संजय गुडदे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. प्रशासकीय अधिकारी आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत पीडितांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले.









