मुंबई उच्च न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाचा निर्णय; गणेशोत्सवातील मद्यविक्रीवरील निर्बंध झाले मर्यादित
पुणे, प्रतिनिधी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात लागू करण्यात आलेली १२ दिवसांची दारूबंदी अखेर मागे घेण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने पुणे जिल्ह्यातच एवढ्या मोठ्या कालावधीसाठी दारूबंदी का, असा सवाल करत प्रशासनाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय बदलला आहे.
नव्या निर्णयानुसार १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी सायंकाळी ४ वाजेपर्यंत मद्यविक्रीवरील निर्बंध राहणार आहेत. तर २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी संपूर्ण दिवस दारूबंदी असणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात सलग १२ दिवस दारूविक्री बंद ठेवण्याचा पूर्वीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे.
गणेशोत्सवातील कायदा-सुव्यवस्था आणि विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सुरुवातीला १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान व्यापक मद्यविक्री निर्बंध लागू केले होते. या निर्णयाला मद्यविक्रेते आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांच्या संघटनांनी न्यायालयात आव्हान दिले होते.
उच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान पुणे जिल्ह्यालाच अशा प्रकारे लक्ष्य करण्यामागील कारण काय, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. न्यायालयाच्या निरीक्षणानंतर प्रशासनाने निर्बंधांचा कालावधी कमी करण्याची भूमिका घेतली. आता जिल्हाधिकारी याबाबत सुधारित आदेश जारी करणार आहेत.
पुणेकरांसाठी महत्त्वाचे :
१२ दिवसांची सलग दारूबंदी आता लागू राहणार नसून, १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत आणि २५ सप्टेंबर रोजी पूर्ण दिवस हे प्रमुख निर्बंध राहणार आहेत.
पत्रकार, अशोक चव्हाण
सारथी महाराष्ट्राचा
पुणे जिल्हा प्रतिनिधी









