पुरंदर ::प्रतिनिधी
डॉ. विनायक गायकवाड
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सासवड शहरातील बसस्थानक परिसरात दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक घेण्यात आले. या वेळी सहा पोलिस अधिकारी आणि १८ पोलिस अंमलदारांनी सहभाग घेत प्रत्यक्ष सराव केला. याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष घोळवे यांनी माहिती दिली.
गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होते. यामुळे संभाव्य तणावपूर्ण परिस्थितीला तातडीने सामोरे जाण्यासाठी पोलिस दलाची तयारी तपासण्यात आली. जमाव नियंत्रण, परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळविणे, पोलिस अधिकारी
व अंमलदारांमध्ये समन्वय राखणे तसेच संवेदनशील प्रसंगी कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने या रंगीत तालमीत सराव करण्यात आला. गणेशोत्सव हा सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचा उत्सव आहे. त्यामुळे भक्तीच्या वातावरणाला गालबोट लागू नये, कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि नागरिकांना सुरक्षित वातावरणात उत्सव साजरा करता यावा, यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.









