शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या
पाथरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा; शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या
मंत्रिमंडळाच्या घोषणांतील रखडलेली विकासकामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी
पाथरी ( प्रतिनिधी ) अहमद अन्सारी पाथरी परभणी
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर पाथरी तालुक्यातील रखडलेली विकासकामे तातडीने पूर्ण करावीत तसेच पावसाअभावी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेना (ऊबाठा )चे ऊपजिल्हाप्रमुख मुंजाजी ज्ञानदेव कोल्हे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मराठवाड्याचा विकासातील अनुशेष भरून काढण्यासाठी विविध सरकारांच्या काळात छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाच्या बैठका घेऊन अनेक महत्त्वपूर्ण विकासकामांच्या घोषणा करण्यात आल्या. सप्टेंबर २०१६ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तसेच १६ सप्टेंबर २०२३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीसह यापूर्वीच्या विविध बैठकींमध्ये परभणी जिल्ह्यासाठीही अनेक घोषणा करण्यात आल्या.
मात्र, घोषणा होऊन अनेक वर्षे उलटूनही काही विकासकामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. काही कामे कागदावरच असून काही कामांना संथगतीने चालना मिळत असल्याने पाथरी तालुक्यातील नागरिकांमध्ये नाराजी आहे. घोषित कामांची सद्यस्थिती स्पष्ट करून रखडलेली कामे तातडीने मार्गी लावावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या पाथरी तालुक्यात मागील सुमारे एक ते दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके पावसाअभावी वाळून जात असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे संपूर्ण पाथरी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये तातडीची आर्थिक मदत द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला गती द्या
पाथरी येथील श्री साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासह तालुक्यातील विविध विकासकामांना गती देऊन त्यांची अंमलबजावणी तातडीने करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. विकासाच्या घोषणा केवळ कागदावर न राहता त्याचा प्रत्यक्ष लाभ पाथरी तालुक्यातील जनतेला मिळावा, यासाठी प्रशासनाने ठोस कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या निवेदनावर शिवसेना ऊपजिल्हाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे, शिवसेना तालूकाप्रमुख हरीभाऊ वाकनकर, शिवसेना तालुका प्रमूख रियाज शेख, रावसाहेब निकम, तुकाराम हारकळ, माऊली गलबे, बालासाहेब शिंदे, सुभाष दुगाने, रमेश नायक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.







