
समाजाच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांचे आवाहन
गाडी लोहार समाजाच्या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात गुणवंतांचा सन्मान
शहादा : समाजाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने एकनिष्ठेने समाजासोबत राहून एकत्रितपणे काम करणे गरजेचे आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःची प्रगती साधतानाच समाजाच्या विकासाचाही विचार केला पाहिजे. मुलांचे भवितव्य घडविताना केवळ त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष न देता त्यांचा मित्रपरिवार, ते कुठे जातात, काय करतात याचीही माहिती पालकांनी ठेवणे आवश्यक आहे. सध्याच्या काळात मोबाईलच्या अतिवापरामुळे कुटुंबातील सदस्यांमधील मनमोकळा संवाद कमी होत असून, पालकांनी मुलांशी संवाद वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांनी केले.
नंदुरबार जिल्हा गाडी लोहार समाज मंडळाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव व सन्मान सोहळा–२०२६ मध्ये अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबांधवांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
अश्विनी सानप म्हणाल्या की, समाजाच्या वतीने मिळणारा सन्मान हा प्रत्येकासाठी प्रेरणादायी असतो. समाजाने केलेल्या सत्काराचा आदर करून प्रत्येकाने समाजाच्या मागे एकनिष्ठेने उभे राहिले पाहिजे. समाजाला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. पालकांनी मुलांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या दैनंदिन जीवनाकडेही लक्ष द्यावे. मुलगा किंवा मुलगी कुठे जात आहे, कोणाच्या संगतीत आहे आणि काय करीत आहे, याची माहिती पालकांना असणे आवश्यक आहे.
मोबाईलच्या वाढत्या वापराबाबत चिंता व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, मोबाईल हे माहिती व ज्ञानाचे प्रभावी साधन असले तरी त्याचा अतिवापर मुलांच्या मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकतो. पूर्वी कुटुंबातील सदस्य एकत्र बसून मनमोकळा संवाद साधत होते. मात्र, आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्याने संवादाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना वेळ देऊन त्यांच्याशी मित्रत्वाच्या नात्याने संवाद साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
संस्कार आणि योग्य दिशा देणे गरजेचे
नगराध्यक्ष अभिजीत पाटील म्हणाले की, समाजाने केलेला सत्कार हा फार मोठा सन्मान असतो. आई-वडिलांनी मुलांना दिलेले संस्कार कधीही वाया जात नाहीत. बदलत्या परिस्थितीत पालकांनी मुलांच्या जडणघडणीकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. आई मुलांशी संवाद साधते; मात्र अनेकदा वडील मुलांशी पुरेसा संवाद साधत नाहीत, ही खेदाची बाब आहे. मुलींवरच बंधने न ठेवता मुलांनाही योग्य शिस्त व दिशा देणे गरजेचे आहे. मोबाईलच्या मायाजालापासून मुलांना दूर ठेवून त्यांना शिक्षण, संस्कार व चांगल्या सवयींकडे वळवावे, असे त्यांनी सांगितले.
उपनगराध्यक्ष माधवी मकरंद पाटील म्हणाल्या की, समाजाच्या वतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येणे आवश्यक आहे. प्रत्येकाने यशाची उंच भरारी घेताना आपल्या समाजाचाही विचार केला पाहिजे. व्यक्ती समाजासोबत पुढे गेली तर त्यातून समाजाचेही नाव मोठे होते. त्यामुळे समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
राजेंद्र जाधव यांना समाजभूषण पुरस्कार
यावेळी नंदुरबार जिल्हा गाडी लोहार समाजाच्या वतीने प्रथमच शहादा येथील गाडी लोहार समाजाचे शहराध्यक्ष राजेंद्र शंकर जाधव यांना त्यांच्या संघर्षमय व यशस्वी जीवनप्रवासाबद्दल समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. विविध शैक्षणिक क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजबांधवांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी गुलाबराव पाटील, नगराध्यक्ष अभिजीत पाटील, उपनगराध्यक्ष माधवीताई मकरंद पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी बांधकाम व आरोग्य सभापती हेमलताई शशिकांत शितोळे-पाटील, ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या विद्या दीदी, नंदुरबार जिल्हा गाडी लोहार समाज मंडळाचे अध्यक्ष रुपेश जाधव, नवापूर नगरपालिकेच्या आरोग्य सभापती मीनलताई लोहार, शहादा शहर गाडी लोहार समाजाचे अध्यक्ष समाजभूषण राजेंद्र जाधव, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी विकास राठोड, नवापूर पालिकेचे माजी नगरसेवक अमृत लोहार, जिल्हा मंडळाचे सचिव जितेंद्र लोहार, तळोदा येथील शिक्षण विस्तार अधिकारी कैलास लोहार, रविंद्र लोहार, दिनेश लोहार, गोपाळ कुकावलकर, मोहन लोहार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमास गाडी लोहार समाजातील समाजबांधव, गुणवंत विद्यार्थी, पालक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठी उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करण्यासोबतच समाजाच्या संघटनात्मक बळकटीकरणाचा संदेश या सोहळ्यातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष जाधव यांनी केले. सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले, तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी कैलास लोहार यांनी मानले.





