FSSAI कडून दूधापासून न बनलेल्या पनीरच्या विक्रीवरील निर्बंधाबाबत मसुदा; नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या
श्रीगोंदा : प्रतिनिधी : श्रीगोंदा मतदारसंघातील विविध प्रश्नांबाबत आमदार विक्रम पाचपुते यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या पार्श्वभूमीवर पनीरच्या गुणवत्तेसंदर्भातील मुद्द्याला केंद्रीय स्तरावर दखल मिळाल्याचे त्यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
आमदार विक्रम पाचपुते यांनी विधिमंडळात दूधापासून तयार न झालेल्या घटकांपासून बनविल्या जाणाऱ्या ‘Analog Paneer’ संदर्भात प्रश्न उपस्थित करून कारवाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (FSSAI) २४ सप्टेंबर २०२६ रोजी दूधापासून प्राप्त नसलेल्या घटकांपासून तयार केलेल्या पनीरच्या विक्रीवर निर्बंध घालण्यासंदर्भातील मसुदा अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
या मसुद्यावर केंद्र सरकारकडून नागरिक, संबंधित संस्था आणि इतर हितधारकांकडून सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यामुळे या विषयावर नागरिकांनी आपली मते व सूचना नोंदवाव्यात, असे आवाहन आमदार विक्रम पाचपुते यांनी केले आहे.
दूध उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांच्या हिताचा मुद्दा
पनीरच्या गुणवत्तेचा प्रश्न हा ग्राहकांच्या अन्नसुरक्षेबरोबरच दूध उत्पादक शेतकऱ्यांशी संबंधित असल्याचे आमदार पाचपुते यांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रस्तावित नियमांबाबत नागरिकांनी आणि संबंधित घटकांनी आपापल्या सूचना व हरकती नोंदवाव्यात, असे त्यांनी आवाहन केले.
दरम्यान, FSSAI च्या अधिकृत नोंदीनुसार सध्या हा मसुदा टप्प्यातील प्रस्ताव असून अंतिम नियम लागू झाल्याचे अद्याप नमूद केलेले नाही. त्यामुळे पुढील निर्णयासाठी मसुद्यावर प्राप्त होणाऱ्या सूचना व हरकती महत्त्वाच्या ठरणार आहेत.











