१ ऑक्टोबरपासूनची १० रुपयांची वाढ रद्द; दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्कही माफ
पुणे : प्रतिनिधी अशोक चव्हाण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विद्यापीठाच्या मेसमधील जेवणाच्या दरात १ ऑक्टोबरपासून प्रस्तावित करण्यात आलेली १० रुपयांची वाढ मागे घेण्यात आली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळसदृश परिस्थितीचा विचार करून २६ सप्टेंबर रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
विद्यापीठाने १७ सप्टेंबर रोजी मेसच्या सुधारित दराबाबत परिपत्रक काढल्यानंतर विद्यार्थी संघटनांकडून दरवाढीला विरोध करण्यात आला होता. विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा विचार करून प्रस्तावित दरवाढ लागू न करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने मेसच्या जेवणाचा अतिरिक्त आर्थिक भार विद्यार्थ्यांवर पडणार नाही.
दरम्यान, मेस आणि कॅन्टीनमधील अन्नाची गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सुविधांचा आढावा घेण्यासाठी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार आहे. ही समिती अन्नाची गुणवत्ता, उपलब्ध सुविधा आणि सेवांमध्ये आवश्यक सुधारणा याबाबत शिफारसी करणार आहे.
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ
दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त तालुक्यांतून विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या आगामी परीक्षांचे शुल्क माफ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या संबंधित विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे.








