कुरुंदवाड पोलिसांचा माणुसकीचा आदर्श; गणेशमूर्तीचे विसर्जन करून पुन्हा २७ गावांच्या सुरक्षेसाठी कर्तव्यावर हजेरी
कुरुंदवाड, प्रतिनिधी : सण म्हटला की उत्साह, आनंद आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याची इच्छा स्वाभाविक असते. मात्र कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस कर्मचारी सणाच्या दिवशीही कर्तव्यावर तैनात असतात. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २७ गावांमध्ये यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कुरुंदवाड पोलिसांनी चोख भूमिका बजावत कर्तव्य आणि माणुसकीचा सुंदर संगम घडवून आणला.
गणेशोत्सवाच्या काळात शहरातील गर्दीचे नियोजन, वाहतूक नियंत्रण, महिला व बालकांची सुरक्षितता तसेच अनुचित प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस कर्मचारी रात्रंदिवस कार्यरत होते. नागरिकांना उत्सवाचा आनंद घेता यावा, यासाठी वर्दीतले हे ‘देवमाणूस’ स्वतःच्या आनंदाला काही काळ बाजूला ठेवून कर्तव्य बजावत होते.
पोलीस ठाण्यातही गणरायाची प्रतिष्ठापना
कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या कार्यालयातही गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. पोलिसांनाही सणाचा आनंद घेण्याची इच्छा असली तरी २७ गावांतील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असल्याने त्यांच्या उत्सवावर कर्तव्याच्या मर्यादा होत्या. कुटुंबीयांकडे वेळ कमी मिळत असतानाही पोलिसांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली.
दुपारी गणरायाला निरोप; त्यानंतर पुन्हा कर्तव्यावर
अनंत चतुर्दशीच्या दिवशी पोलीस ठाण्यातील गणेशमूर्तीचे विसर्जन दुपारी १२ वाजता करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड, पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील, पोलीस शिपाई तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेतला.
विशेष म्हणजे यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एकसारखे पोशाख परिधान केले होते. नेहमी खाकी वर्दीत दिसणाऱ्या पोलिसांचा गणेशोत्सवानिमित्त वेगळाच अंदाज यावेळी पाहायला मिळाला. कुटुंबीयांसोबत गणरायाला भावपूर्ण निरोप दिल्यानंतर दुपारनंतर सर्व कर्मचारी पुन्हा २७ गावांतील गणेशोत्सव मंडळे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कर्तव्यावर हजर झाले.
सणाच्या दिवशीही कर्तव्याला प्राधान्य देत नागरिकांचा उत्सव सुरक्षित करण्यासाठी झटणाऱ्या कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. ‘स्वतःचा आनंद बाजूला ठेवून नागरिकांच्या आनंदासाठी कर्तव्य बजावणाऱ्या वर्दीतल्या देवमाणसांना मानाचा मुजरा’, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.







