लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडचा उपक्रम; सचिन अडसूळ प्रथम, तुषार चव्हाण द्वितीय तर सुमित पवार तृतीय
कुरुंदवाड, प्रतिनिधी : शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या वतीने आयोजित घरगुती गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पार पडला. लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला स्पर्धक, लायन्स क्लबचे पदाधिकारी, मान्यवर आणि नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला लायन्स क्लब ऑफ कुरुंदवाडच्या अध्यक्षा माधुरी सावगावे आणि शिरोळ नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराज यादव यांच्या हस्ते गणपतीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षा माधुरी सावगावे यांनी स्वागत व प्रास्ताविक करून स्पर्धेचा उद्देश स्पष्ट केला.
यावेळी पृथ्वीराज यादव यांनी अशा स्पर्धांमधून कौटुंबिक एकता, सर्जनशीलता आणि सामाजिक बांधिलकीला चालना मिळते, असे सांगितले. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करणे, पर्यावरणपूरक सजावट, सामाजिक संदेश आणि जनजागृती यांसारख्या बाबींचा विचार करून स्पर्धकांनी सजावट केल्याचे त्यांनी नमूद केले. कुरुंदवाडमध्ये लायन्स क्लबच्या अध्यक्षा माधुरी सावगावे यांनी प्रथमच हा उपक्रम राबविल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
या स्पर्धेत एकूण १७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये प्रथम क्रमांक सचिन नारायण अडसूळ यांनी पटकावला. त्यांना शिल्ड, सन्मानपत्र आणि २ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. द्वितीय क्रमांक तुषार सुरेश चव्हाण यांना शिल्ड, सन्मानपत्र व १ हजार ५०० रुपये, तर तृतीय क्रमांक सुमित सुशांत पवार यांना शिल्ड, सन्मानपत्र व १ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. तसेच १४ स्पर्धकांना उत्तेजनार्थ सामूहिक बक्षिसे देण्यात आली.
यावेळी रोटरी क्लब कुरुंदवाडचे अध्यक्ष शिवाजी बाबर यांचा सत्कार करण्यात आला. शिरोळमध्ये सामाजिक उपक्रमांतर्गत मोफत नेत्रतपासणी करून गरजू नागरिकांना चष्मे देण्याचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती पृथ्वीराज यादव यांनी दिली. तसेच लायन्स क्लबला ५०० चष्मे देण्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास लायन्स क्लबच्या सचिव शैलजा आलासे, खजिनदार रुपाली व्होरा, माजी प्रांतपाल सुनील सुतार, प्रकाश व्होरा, विजय जमदग्नी, बाबासाहेब सावगावे, सुभाष आलासे, रविकिरण गायकवाड, रुपाली चव्हाण, आसावरी जमदग्नी, पांडुरंग मोहिते, आर. आर. पाटील, अॅड. देवराज मगदूम, आश्रमशाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब तिबिले, विनोद चव्हाण सर, वाय. एस. पाटील, सुनीता शिंदे, शैलजा सावगावे, वैशाली घोरपडे, पत्रकार, सहभागी स्पर्धक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. विजय जमदग्नी यांनी केले, तर रविकिरण गायकवाड यांनी आभार मानले.






