शिक्षणातून सामाजिक परिवर्तन घडविणारे कर्मवीर; महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन
श्रीगोंदा : प्रतिनिधी
सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम म्हणजे शिक्षण होय. याची आत्मजाणीव कर्मवीर भाऊराव पाटील यांना होती. त्यामुळेच बहुजन समाजाच्या उत्थानासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत कर्मवीरांचे मोठे योगदान आहे. ते महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचे वारसदार होते. आज रयत शिक्षण संस्थेतील शिक्षक कर्मवीरांचा विचार व वारसा पुढे नेत आहेत. रयत शिक्षण संस्था काळानुरूप बदल स्वीकारणारी संस्था आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ॲड. भगीरथ शिंदे यांनी केले.
महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात रयत संकुलाच्या वतीने आयोजित कर्मवीर भाऊराव पाटील जयंती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. प्रमुख वक्ते म्हणून रयत शिक्षण संस्थेचे माध्यमिक विभागाचे सहसचिव बंडू पवार उपस्थित होते. कर्मवीर भाऊराव पाटील यांना महात्मा फुले, महात्मा गांधी आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांची प्रेरणा मिळाली. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून बहुजन समाजाच्या विकासासाठी मोठे कार्य केले. आजच्या युवकांनी कौशल्याधिष्ठित शिक्षण घेऊन व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधावा, असे मत बंडू पवार यांनी व्यक्त केले.
मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य बाबासाहेब भोस यांनी रयत शिक्षण संस्थेत गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असून कर्मवीरांच्या त्यागाचे स्मरण ठेवावे, असे आवाहन केले. विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनीही यावेळी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री बबनराव पाचपुते होते. रयत ही माणसं घडविणारी संस्था असून कर्मवीरांचा विचार व वारसा रयतच्या माध्यमातून जोपासला जात आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. प्रकाश साळवे यांनी केले. प्रतिमापूजनानंतर श्रीमंत राजमाता कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सुमधुर स्वरात रयत गीत सादर केले. यावेळी गणेश भोस यांची जनरल बॉडी सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल तसेच डॉ. देवेंद्र बहिरम यांनी पीएच.डी. पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रमुख संपादक डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी संपादित केलेल्या ‘भगीरथ’ नियतकालिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कर्मवीर जयंतीनिमित्त महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालयात श्रम प्रतिष्ठा दिन साजरा करण्यात आला. तसेच रांगोळी, वक्तृत्व, निबंध आणि पुष्पसजावट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धांना विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमास सुभाषशेठ गांधी, कुंडलिकराव दरेकर, माजी विभागीय अधिकारी तुकाराम कन्हेरकर, महावीर पटवा, रवीशेठ दंडनाईक, रत्नप्रभा बोरुडे, ज्योत्स्ना भंडारी, उद्योजक संजय मचे, नगरसेवक, मुख्याध्यापक राजेंद्र खेडकर, डॉ. ज्ञानदेव भोसले, पीटर रणसिंग, भगवान गोरखे, गणेश कविटकर, पत्रकार जगताप, पत्रकार कुरुमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. देवेंद्र बहिरम, प्रा. संजय फटे आणि प्रा. संदीप दरेकर यांनी केले. अहवाल वाचन प्राचार्य दिलीप भुजबळ व मुख्याध्यापिका श्रीमती वर्षा भोईटे यांनी केले. आभार पर्यवेक्षक प्रा. रत्नाकर झिटे यांनी मानले.








