भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुकली जखमी; उपचारासाठी नागपूरला दाखल
वणी : प्रतिनिधी
विठ्ठलवाडी, प्रभाग क्रमांक १ येथे भटक्या कुत्र्याने एका चिमुकल्या मुलीवर हल्ला केल्याची घटना घडली. या घटनेत मुलीला दुखापत झाली असून, पुढील उपचारासाठी तिला नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
विठ्ठलवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला असून, विशेषतः लहान मुले व महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने घटनेची तातडीने दखल घेऊन कुत्रे पकडण्यासाठी पथक व आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच परिसरातील भटक्या कुत्र्यांचे सर्वेक्षण करून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमानुसार कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर कारवाई करण्याऐवजी भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
दरम्यान, जखमी चिमुकलीची प्रकृती लवकर सुधारून ती सुखरूप घरी परतावी, अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली आहे.







