पोस्टल कर्मचाऱ्यांनी बदलत्या काळानुसार स्वतःला अपडेट ठेवावे; पनवेल येथे पोस्टल युनियनचे दहावे द्विवार्षिक अधिवेशन
उरण, दि. २७ : प्रतिनिधी
“पोस्टाचे कामगार कालानुरूप बदल स्वीकारत आहेत. येणाऱ्या काळात आव्हाने असणारच आहेत. त्यामुळे स्वतःला सतत अपडेट ठेवणे आणि माणुसकी हा धर्म समजून काम करणे गरजेचे आहे. मी समाजासाठी काम करत असताना जात-धर्म पाहत नाही. माणुसकी हाच खरा धर्म आहे, हे माझ्या हृदयात कोरलेले आहे,” असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले.
पनवेल येथे रविवारी (दि. २६) नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉईजच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पोस्टल युनियनच्या दहाव्या द्विवार्षिक अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी पोस्टल युनियनच्या वतीने महेंद्रशेठ घरत यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर, पनवेलचे महापौर नितीन पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
महेंद्रशेठ घरत पुढे म्हणाले की, रामशेठ ठाकूर यांनी व्यवसायात स्थिरावल्यानंतर रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाची स्थापना केली. या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. भगत साहेबांच्या नावाने शैक्षणिक संस्था सुरू करण्यात आली असून ती राज्यातील आघाडीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये स्थान मिळवत आहे. तसेच दर्जेदार स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभारून खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. आपण राजकारणविरहित काम करत असल्याने सर्वपक्षीयांना एका व्यासपीठावर आणण्याचे काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या अधिवेशनाला पोस्टल विभागातील कर्मचारी तसेच युनियनचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बदलत्या काळातील आव्हाने, कर्मचारी हिताचे प्रश्न आणि संघटनात्मक कामकाज याबाबत अधिवेशनात चर्चा करण्यात आली.







