जीर्ण पिलरमुळे निर्माण झालेला धोका टळला; श्री बाबदेव मित्रमंडळाने मानले वैभव कडू यांचे आभार
उरण, दि. २७ : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील नागाव गोसपाडा (पिंपळआळी) येथील श्री बाबदेव मित्रमंडळाच्या समाजमंदिराची अवस्था जीर्ण झाली होती. समाजमंदिरातील पिलर जीर्ण झाल्याने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. ही बाब लक्षात येताच समाजमंदिराच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी सामाजिक कार्यकर्ते वैभव यशवंत कडू यांनी पुढाकार घेतला.
मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी नागाव-म्हातवली प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष तसेच आई मांगीनदेवी पारंपरिक मच्छीमार सोसायटी, नागावचे चेअरमन आणि सामाजिक कार्यकर्ते वैभव कडू यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कडू यांनी मंडळाची विनंती तात्काळ मान्य करत समाजमंदिराच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.
दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण झाल्याने समाजमंदिर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात संभाव्य धोका टळल्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.
“सामाजिक बांधिलकीतून केलेली मदत हीच खरी सेवा” या भावनेतून सहकार्य केल्याबद्दल श्री बाबदेव मित्रमंडळ, नागाव गोसपाडा (पिंपळआळी) यांच्या वतीने वैभव कडू यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. समाजमंदिराच्या दुरुस्तीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागला असून, सामाजिक कार्यातून नागरिकांच्या अडचणी सोडविण्याच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.






