दौंड कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट कांदा उत्पादक शेतकरी म्हणून गौरव
मळद : प्रतिनिधी — लोकनेते स्व. आमदार सुभाषआण्णा कुल कृषी भूषण पुरस्कार २०२५-२६ अंतर्गत दौंड कार्यक्षेत्रातील उत्कृष्ट कांदा उत्पादन व वखार साठवणूक करणारे शेतकरी म्हणून दादासो कृष्णा भागवत यांचा गौरव करण्यात आला. दौंडचे आमदार राहुलदादा कुल यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दादासो भागवत यांना शेतीची विशेष आवड असून, आधुनिक तंत्रज्ञान, मेहनत आणि योग्य नियोजनाच्या माध्यमातून त्यांनी शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विशेषतः कांदा उत्पादन व वखार साठवणुकीमध्ये त्यांनी वेगळा ठसा निर्माण केला आहे. कांद्यासोबतच ऊस पिकाचेही उत्कृष्ट उत्पादन घेणारे शेतकरी म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे.
कष्ट, सातत्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीला नवे स्वरूप देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या सन्मानाबद्दल पंचक्रोशीतील शेतकरी, ग्रामस्थ व मित्रपरिवारातून अभिनंदन होत आहे.










