वाफे आणि खुटघर येथे एकाच दिवशी १४९ महिलांची नोंदणी; महिला शेतकऱ्यांना मिळणार हक्काची ओळख व प्रमाणपत्र.
राज्यातील शेती आणि पशुपालन क्षेत्रात राबणाऱ्या महिलांना ‘शेतकरी’ म्हणून कायदेशीर ओळख देण्यासाठी राज्य शासनाने ‘महाराष्ट्र महिला शेतकरी सक्षमीकरण अधिनियम, २०२६’ लागू केला आहे. या अधिनियमाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी आणि गावोगावी अर्ज भरून घेण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच ‘आत्मा’ (ATMA) आणि कृषी विभागाच्या वतीने तालुक्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबवले जात आहे. या अभियानांतर्गत शहापूर तालुक्यातील तब्बल ५,००० पेक्षा अधिक महिला शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे.
तालुका कृषी अधिकारी मा. श्री. कुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली १७ सप्टेंबर २०२६ ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत हे अभियान चालणार आहे. आज दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी तालुक्यातील वाफे आणि खुटघर येथे विशेष शिबीर घेऊन एकाच दिवसात १४९ महिलांचे ऑनलाईन अर्ज भरण्यात आले.
‘आत्मा’ चे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. जितेश हरिभाऊ खांडगे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. विनोद दत्तात्रय कदम आणि १६ क्लस्टर मधील ३२ कृषी सखींच्या (राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन) अथक परिश्रमामुळे हा ५ हजारांचा टप्पा पार पडला आहे. यामध्ये ‘आत्मा’ महिला शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी (FPO) आणि महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (MAVIM) सदस्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
पात्रतेचे निकष आणि अटी:
या अधिनियमांतर्गत ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ मिळवण्यासाठी खालील निकष ठरवण्यात आले आहेत:
- अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
- महिला शेतकऱ्याचे वय १८ वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे.
- स्वतःच्या नावावर शेतजमीन असणाऱ्या महिलांसोबतच, भाडेतत्वावर शेती करणाऱ्या (Tenant Farmers), भूमीहीन महिला शेतमजूर आणि महिला पशुपालक देखील या योजनेसाठी पूर्णपणे पात्र आहेत.
महाकृषी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया:
महिला शेतकऱ्यांना अत्यंत सोप्या पद्धतीने स्वतः किंवा कृषी सखींच्या मदतीने नोंदणी करता येईल:
१. सर्वप्रथम कृषी विभागाच्या अधिकृत महाकृषी महिला शेतकरी पोर्टलला भेट द्यावी.
२. तिथे महिला अर्जदाराला आपल्या आधार कार्डच्या माध्यमातून e-KYC (Aadhaar Authentication) प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.
३. त्यानंतर आपले नाव, पत्ता, जिल्हा, तालुका, गाव आणि शेती/पशुपालनाचा तपशील भरून अर्ज सबमिट करावा.
४. अर्ज मंजूर झाल्यानंतर पोर्टलच्या डॅशबोर्डवरून अधिकृत ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ थेट डाऊनलोड करता येईल.
योजनेचे मुख्य फायदे:
हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर महिला शेतकऱ्यांना खालील मोठे फायदे मिळतील: - शासकीय ओळख: कौटुंबिक किंवा सामाजिक स्तरावर महिलांना ‘शेतकरी’ म्हणून अधिकृत कायदेशीर ओळख मिळेल.
- योजनांमध्ये प्राधान्य: कृषी विभागाच्या व इतर शासकीय योजनांमध्ये (उदा. कृषी अवजारे, गृह उद्योग) महिलांना प्राधान्य दिले जाईल.
- सबसिडी आणि सवलती: बियाणे, खते आणि इतर निविष्ठांवर मिळणाऱ्या शासकीय अनुदानाचा थेट लाभ घेता येईल.
- कर्ज सुलभता: बँक कर्ज मिळवताना किंवा शेतीपूरक व्यवसायासाठी निधी उभा करताना या प्रमाणपत्राचा मोठा फायदा होईल.
१७ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या सेवा संकल्प अभियानात तालुक्यातील उर्वरित सर्व पात्र महिलांनी त्वरित आपली नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन शहापूर तालुका कृषी विभाग आणि ‘आत्मा’ यंत्रणेच्या वतीने करण्यात आले आहे.










