सुफीसंत अवलिया चिणगीबाबांच्या परंपरेचे आजही जतन; श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांच्या उपस्थितीत संस्थानकालीन शस्त्रांची पूजा आणि पालखी मिरवणूक
जत | प्रतिनिधी
जत येथील श्रीमंत डफळे संस्थानच्या वतीने विजयादशमीनिमित्त जुन्या राजवाड्यासमोरील चिणगीबाबा बुरुजावर पांढरा ध्वज फडकावून दसरा उत्सवाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी थोरल्या वेशीत शमीपूजन, संस्थानकालीन शस्त्रांची पूजा आणि पारंपरिक सीमोल्लंघनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. श्रीमंत डफळे संस्थानचे वारसदार श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे धार्मिक विधी पार पडले.
पांढऱ्या ध्वजामागे चिणगीबाबांची परंपरा
जत संस्थान आणि सुफीसंत अवलिया चिणगीबाबा यांच्याशी संबंधित ऐतिहासिक परंपरेला विशेष महत्त्व आहे. डफळे घराण्याचे वारसदार सटवाजी डफळे हे विजापूरकडे जात असताना त्यांची एका सुफीसंताशी भेट झाली. सटवाजी डफळे यांना लवकरच राजपद प्राप्त होईल, अशी भविष्यवाणी या संतांनी केल्याची आख्यायिका सांगितली जाते. आपण राजा झाल्यास राजवाड्यासमोर पांढरे निशाण लावून राज्यकारभार करू, असे वचन सटवाजी डफळे यांनी त्यावेळी दिल्याचे सांगितले जाते.
पुढे सटवाजी डफळे यांना विजापूर दरबाराकडून जतची जहागिरी मिळाली आणि ते जत संस्थानचे संस्थानिक झाले. त्यानंतर त्यांनी दिलेल्या वचनानुसार पांढरा ध्वज फडकावण्याची परंपरा सुरू केल्याचे सांगितले जाते. कालांतराने चिणगीबाबांच्या स्मरणार्थ जुन्या राजवाड्याशेजारी बुरुज उभारण्यात आला. तेथे जुन्या तोफेच्या लोखंडी नळीमध्ये बांबू रोवून त्यावर पांढरा ध्वज फडकवण्याची प्रथा सुरू झाली. आजही विजयादशमीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी हा ध्वज विधिवत पूजन करून फडकवण्यात येतो.
यंदाही श्रीमंत शार्दूलराजे डफळे यांच्या हस्ते जुन्या राजवाड्यासमोरील बुरुजावर पांढऱ्या ध्वजाचे पूजन करून तो फडकवण्यात आला.
संस्थानकालीन शस्त्रांसह पालखी मिरवणूक
सायंकाळी सीमोल्लंघन सोहळ्यापूर्वी जुन्या राजवाड्यापासून संस्थानकालीन शस्त्रे ठेवलेली पालखी काढण्यात आली. श्रीराम मंदिरापासून थोरल्या वेशीपर्यंत सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत श्री यल्लमादेवी प्रतिष्ठान, जतचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूलराजे डफळे, अरुण उर्फ बारू शिंदे, अनिल शिंदे, बाळासाहेब माळी, पापा सनदी, कैलास गायकवाड, संग्राम राजेशिर्के, दिनकर पतंगे, डॉ. विजय पाटील, प्रवीण पाटील, मदन पाटील आणि मोहन मानेपाटील यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी झाले.
शमीपूजन आणि पारंपरिक सीमोल्लंघन
पालखी थोरल्या वेशीत पोहोचल्यानंतर तेथे रचून ठेवलेल्या शमी वृक्षाच्या फांद्यांच्या ढिगाभोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. त्यानंतर पुरोहित गिरीश कुलकर्णी यांनी धार्मिक विधी पार पाडले. पालखीतून संस्थानकालीन शस्त्रे बाहेर काढून त्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. आरतीनंतर उपस्थितांनी शमीच्या ढिगाऱ्यातील पाने घेण्याची पारंपरिक प्रथा पार पाडली.
ही पाने एकमेकांना ‘सोने घ्या, सोने; सोन्यासारखे राहा’ असे म्हणत देण्यात आली. त्यानंतर एकमेकांना आलिंगन देऊन दसऱ्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या. अशा प्रकारे जत संस्थानातील ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेशी जोडलेला सीमोल्लंघनाचा सोहळा उत्साहात संपन्न झाला.
या वेळी गुरुनाथ बिज्जरगी, पांडुरंग कटरे सर, प्रा. चंद्रसेन मानेपाटील, सुधीर चव्हाण, शाहू भोसले, ॲड. श्रीपाद अष्टेकर, डॉ. देवानंद वाघ, मदन जाधव यांच्यासह अनेक मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जत संस्थानच्या ऐतिहासिक परंपरेचे जतन करणारा पांढरा ध्वज, संस्थानकालीन शस्त्रांची पूजा आणि शमीच्या पानांचे सोने म्हणून वाटप या परंपरांमुळे जत येथील दसरा सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.










