दलितमित्र बालासाहेब शिंदे अतनूरकर यांचे प्रबोधन; आदिवासी व डोंगरी भागातील नागरिकांचा मोठा सहभाग
जळकोट | विशेष प्रतिनिधी
जळकोट तालुक्यातील अतिदुर्गम, आदिवासी आणि डोंगराळ भागातील नागरिकांमध्ये बौद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने ७० व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मौजे हिप्पळनारी येथे भव्य बौद्ध धम्म प्रचार व प्रसार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दलितमित्र तथा बौद्ध धम्म उपासक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मेळाव्याला विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
अतनूर पंचायत समिती गणांतर्गत येणाऱ्या अतनूर, गव्हाण, मेवापूर, चिंचोली, मरसांगवी, मरसांगवी तांडा, अतनूर तांडा, रावणकोळा, रामपूर तांडा, शिवाजीनगर, भवानीनगर, सुल्लाळी, डोंगरगाव, फकरू तांडा, चतुर तांडा, मांजरी, कोदळी, रामपूर, देवूळवाडी, गुत्ती, हळदवाढवणा, आवलकोंडा आणि तिरूका आदी गावांतील नागरिकांसाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
शुक्रवार, २० नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता भक्तिमय वातावरणात कार्यक्रमाला सुरुवात झाली. दलितमित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांच्यासह मंचावरील प्रमुख अतिथी, मार्गदर्शक आणि कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व परमपूज्य बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सामूहिक बुद्धवंदना आणि भीमवंदना घेण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिप्पळनारीच्या सरपंच इंदरबाई रामचंद्र शिंदे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य समाजकल्याण मंडळाचे सेवानिवृत्त सचिव बी. एन. कांबळे, महाराष्ट्र दलित तरुण संघटनेचे अध्यक्ष दिनेशबाबू वाघमारे, ॲड. एस. एस. गायकवाड, प्रा. वर्षा बिरादार-मरगणे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मायाताई कांबळे, जिजामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा संध्या शिंदे, वसुंधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा रुक्मिणीबाई सोमवंशी, ज्येष्ठ पत्रकार संजय ऊर्फ बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, आरोग्य योगाचार्य करुणाताई सोनकांबळे, आरोग्यदूत सेवक बी. जी. शिंदे आणि एस. जी. शिंदे उपस्थित होते.
बुद्ध-भीम विचार प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवा : बालासाहेब शिंदे
मेळाव्यात मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलताना दलितमित्र तथा बौद्ध धम्म उपासक आणि ग्राहक जनजागरण व मार्गदर्शन संस्था समिती (महाराष्ट्र राज्य) चे संस्थापक राज्याध्यक्ष बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बौद्ध धम्म हा केवळ धर्म नसून मानवी जीवन जगण्याची आदर्श पद्धत आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागातील प्रत्येक कुटुंबापर्यंत बुद्ध-भीम विचार पोहोचवणे हीच बाबासाहेबांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले. तसेच समाजातील नागरिकांनी व्यसनमुक्तीचा स्वीकार करावा, शिक्षणाला प्राधान्य द्यावे आणि ग्राहक म्हणून आपल्या हक्कांविषयी जागरूक राहून सन्मानाने जीवन जगावे, असे आवाहनही त्यांनी केले.
स्थानिक कार्यकर्त्यांचे विशेष योगदान
दुर्गम भागात आयोजित करण्यात आलेला हा मेळावा यशस्वी करण्यासाठी हिप्पळनारी येथील स्थानिक कार्यकर्ते राजीव बाबर, राजकुमार कापडे, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे लातूर जिल्हा संघटक बी. जी. शिंदे, प्रवीण सोमवंशी, मयुरी शिंदे, व्यंकटेश शिंदे, ओमकार शिंदे आणि सोनू शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.
अतनूर पंचायत समिती गणातील विविध गावांमधून आणि तांड्यांमधून आबालवृद्धांसह बौद्ध उपासक-उपासिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बुद्ध-भीम विचारांचा प्रसार, शिक्षण, व्यसनमुक्ती आणि सामाजिक जागृतीचा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप उत्साहपूर्ण व मंगलमय वातावरणात झाला.









