राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड; एस. एन. डी. सीबीएसई स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा
प्रतिनिधी
येवला : जगदंबा एज्युकेशन सोसायटी संचलित एस. एन. डी. सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल, बाभुळगाव, ता. येवला येथील विद्यार्थी अखिलेशकुमार उदयकुमार कुऱ्हाडे याने नाशिक विभागीय १७ वर्षांखालील शालेय बॅडमिंटन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले. या कामगिरीच्या जोरावर त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून, शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एका मानाच्या तुऱ्याची भर पडली आहे.
बुधवार, दिनांक २१ ऑक्टोबर २०२६ रोजी जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात नाशिक विभागीय १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या शालेय बॅडमिंटन स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत नाशिक महानगरपालिका, नाशिक ग्रामीण, धुळे महानगरपालिका, धुळे ग्रामीण, जळगाव महानगरपालिका, जळगाव ग्रामीण, मालेगाव महानगरपालिका, नंदुरबार ग्रामीण आणि मालेगाव ग्रामीण या विभागांतील खेळाडूंनी सहभाग घेतला.
या स्पर्धेत नाशिक ग्रामीण विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अखिलेशकुमारने आपल्या खेळातील कौशल्य, मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली. त्याच्या या यशामुळे त्याला राज्यस्तरीय स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी त्याचे हे यश प्रेरणादायी ठरत आहे.
अखिलेशकुमारच्या यशामागे त्याची नियमित मेहनत आणि जिद्द यांसोबतच शाळेचे क्रीडा शिक्षक अमोल गायकवाड यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले. तसेच विद्यालयाच्या प्राचार्या प्राची पटेल आणि संस्थेचे सीईओ समाधान झाल्टे यांचेही सहकार्य लाभले.
अखिलेशकुमारच्या या यशाबद्दल शिक्षक आमदार किशोर भाऊ दराडे, संस्थेचे संचालक कुणाल भाऊ दराडे, रुपेश भाऊ दराडे व सिद्धांत भाऊ दराडे, संस्थेचे व्यवस्थापक समाधान झाल्टे आणि प्राचार्या प्राची पाटील यांनी त्याचे अभिनंदन करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
एस. एन. डी. सीबीएसई स्कूलच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत अखिलेशकुमारच्या यशामुळे आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. आता राज्यस्तरीय स्पर्धेतही तो उत्कृष्ट कामगिरी करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









