वाहनांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनाची कारवाई; शिवसेना तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांचा पाठपुरावा
नांदगाव, जि. नाशिक | प्रतिनिधी
नांदगाव शहराला जोडणाऱ्या रेल्वे अंडरपासच्या दोन्ही टोकांवर बसविण्यात आलेले मोठे काँक्रिटचे गतिरोधक नागरिकांच्या तक्रारीनंतर रेल्वे प्रशासनाने हटविले आहेत. गतिरोधकांची उंची आणि रुंदी अधिक असल्याने चारचाकी वाहनांच्या खालच्या भागाला ते लागत होते. त्यामुळे वाहनांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत होत्या.
शहराला जोडणारा मुख्य रस्ता बंद करून रेल्वे प्रशासनाने अंडरपासच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले होते. या कामांतर्गत अंडरपासचे काँक्रिटीकरण तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने बोगद्याच्या दोन्ही टोकांवर मोठे काँक्रिटचे गतिरोधक बसविले होते.
मात्र, या गतिरोधकांची उंची व रुंदी जास्त असल्याने अंडरपासमधून ये-जा करणाऱ्या चारचाकी वाहनांच्या खालच्या भागाला ते घासत होते. परिणामी वाहनांचे नुकसान होत असल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत होता.
ही बाब उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेना तालुकाप्रमुख संतोष गुप्ता यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी रेल्वे प्रशासनाशी संपर्क साधून दोन्ही गतिरोधक हटविण्याची मागणी केली. त्यांच्या पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासनाने बुधवारी जेसीबीच्या साहाय्याने अंडरपासच्या दोन्ही बाजूंवरील गतिरोधक हटविले.
गतिरोधक हटविण्यात आल्याने वाहनचालकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









