शंभर वर्षांची परंपरा जपली; ‘रासूबाईच्या नावानं चांगभलं’च्या जयघोषात ग्रामस्थांचा मोठा सहभाग
आजरा प्रतिनिधी
आजरा : हरपवडे येथील ग्रामदैवत श्री रासूबाई देवी मंदिरात जागर, काकड आरती आणि शाही दसरा पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात संपन्न झाला. या पारंपरिक सोहळ्यात गावातील ग्रामस्थ, महिला, भाविक तसेच आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हरपवडे गावात जागर, काकड आरती आणि शाही दसरा पालखी सोहळ्याची सुमारे शंभर वर्षांची परंपरा आहे. गावची ग्रामदैवत श्री रासूबाई देवी यांच्यासह मरगुबाई, उत्तकूबाई, शंकराची पिंडी आणि थळ अवगत देव यांना गावचे प्रमुख रक्षक मानले जाते. नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
जागरणाच्या निमित्ताने प्रथम मानकरी पाटील घराण्यातील राजाराम आप्पा पाटील यांनी मानाचा घट वाजतगाजत श्री रासूबाई देवी मंदिरात आणला. त्यानंतर जागर आणि काकड आरती करण्यात आली. मंदिराभोवती पालखीसह भजन करत ग्रामस्थांनी पाच प्रदक्षिणा घातल्या. यावेळी ‘रासूबाईच्या नावानं चांगभलं’, ‘हर हर चांगभलं’ अशा जयघोषाने परिसर भक्तिमय झाला.
दसऱ्याच्या दिवशी शाही थाटात पालखी सीमोल्लंघनासाठी गावाच्या पूर्वेकडील पवार यांच्या घरासमोर नेण्यात आली. तेथे सीमोल्लंघनाचा विधी आणि पूजा करण्यात आली. त्यानंतर ‘सोनं लुटण्याच्या’ पारंपरिक सोहळ्यासाठी फड या ठिकाणी आपट्याची पाने ठेवण्यात आली. महिलांनी त्यांची पूजा केली. त्यानंतर ग्रामस्थांनी पाच फेऱ्या मारून आपट्याची पाने एकमेकांना सोनं म्हणून देण्याची परंपरा जपली.
या सोहळ्याला महिला, पुरुष, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांसह भाविकांनी मोठ्या भक्तिभावाने उपस्थिती लावली. गावातील ग्रामस्थ आणि श्री रासूबाई देवस्थान स्थानिक व्यवस्थापन सल्लागार उपसमिती, हरपवडे यांच्या वतीने संपूर्ण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या उत्सवातून गावातील धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक एकोप्याचे दर्शन घडले.









