मच्छीमारांच्या नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत मिळवून देण्याचे निर्देश; गाळ काढण्यासाठी सीएसआर निधीचा वापर करणार
आष्टी प्रतिनिधी
आष्टी : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सर्वात मोठ्या रूटी तलावाची प्रत्यक्ष पाहणी करून अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यंदाच्या पावसाअभावी रूटी जलाशय पूर्णतः कोरडा पडला असून, मत्स्योत्पादन शून्यावर आले आहे. त्यामुळे मत्स्यव्यवसायावर अवलंबून असलेल्या मच्छीमार बांधवांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
रूटी जलाशयात अपेक्षित ८७ टक्के मत्स्योत्पादनाच्या तुलनेत गतवर्षी ६२ टक्के मत्स्योत्पादन झाले होते. मात्र, यंदा पावसाअभावी जलाशय कोरडा पडल्याने मत्स्योत्पादन शून्य टक्क्यांवर आले आहे. मत्स्यसंगोपनासाठी जलाशयात सोडण्यात आलेले मत्स्यबीजही नष्ट झाल्याने मच्छीमारांच्या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे.
या कठीण परिस्थितीत मच्छीमार बांधवांनी खचून जाऊ नये. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांना आवश्यक ती सर्वतोपरी मदत केली जाईल, असा विश्वास पाहणीदरम्यान व्यक्त करण्यात आला.
गाळ काढण्यासाठी सीएसआर निधीची मदत
रूटी जलाशयातील मत्स्योत्पादन वाढविण्यासाठी साचलेला गाळ काढणे आवश्यक आहे. यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेऊन कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) निधीची मदत घेण्यात येणार आहे. तसेच, शेतकऱ्यांप्रमाणेच मच्छीमारांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य असल्याचे नमूद करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
मच्छीमार बांधवांनी मांडलेल्या विविध मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली. महायुती सरकार मच्छीमारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी निश्चितच प्रयत्नशील राहील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
या पाहणीप्रसंगी स्थानिक आमदार सुरेश धस, मत्स्यआयुक्त भानुदास पालवे, संबंधित अधिकारी आणि मच्छीमार बांधव उपस्थित होते.








