मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार राज्य शासनाची कार्यवाही; २६ ऑक्टोबर २०२६ रोजी अधिसूचना प्रकाशित
नांदेड : नांदेड येथील शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब बोर्डाची मूळ स्थितीत पुनर्स्थापना करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशांचे पालन करून महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना २६ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्र शासन राजपत्राच्या असाधारण भाग चार-अ मध्ये प्रकाशित केली आहे.
२०२२ मधील अधिसूचना न्यायालयाकडून रद्द
नांदेड शीख गुरुद्वारा सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब अधिनियम, १९५६ मधील कलम ६ च्या उपकलम (४) व (५) आणि कलम ११ च्या उपकलम (१) अंतर्गत ८ मार्च २०१९ रोजीच्या अधिसूचनेनुसार गुरुद्वारा बोर्डाची स्थापना करण्यात आली होती. त्यानुसार बोर्डाच्या अध्यक्षांचीही नियुक्ती करण्यात आली होती.

त्यानंतर २९ जून २०२२ रोजीच्या अधिसूचनेद्वारे अधिनियमातील कलम ५३ च्या उपकलम (१) व (२) अंतर्गत अधिकारांचा वापर करून बोर्ड रद्द करण्यात आले होते. त्यानंतर गुरुद्वारा बोर्डाचे कामकाज व व्यवस्थापन चालविण्यासाठी वेळोवेळी प्रशासकांची नियुक्ती करण्यात येत होती.
या निर्णयाला आव्हान देणाऱ्या रिट याचिका क्रमांक १०५५३/२०२२ वर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ६ ऑक्टोबर २०२५ रोजी निर्णय दिला. न्यायालयाने २९ जून २०२२ रोजीची अधिसूचना रद्द करून राज्य शासनाला गुरुद्वारा बोर्डाची मूळ स्थितीत पुनर्स्थापना करण्याचे निर्देश दिले.
शासनाकडून पुनर्स्थापनेची अधिसूचना
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने गुरुद्वारा बोर्डाच्या पुनर्स्थापनेची अधिसूचना जारी केली आहे. राज्यपालांच्या वतीने उपसचिव भगवान सावंत यांच्या स्वाक्षरीने ही अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. अधिसूचनेचा क्रमांक RFD28053(53)/2/2026/J7(A) असा नमूद करण्यात आला आहे.
या अधिसूचनेमुळे २९ जून २०२२ रोजीची अधिसूचना जारी होण्यापूर्वी गुरुद्वारा बोर्डाची जी स्थिती होती, ती पुन्हा बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे विधिवत गठित बोर्डामार्फत तख्त सचखंड श्री हजूर अबचलनगर साहिब गुरुद्वाराचे व्यवस्थापन आणि प्रशासकीय कामकाज पुन्हा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
२९ जून २०२२ रोजी बोर्डावर असलेले पदाधिकारी व सदस्य
त्या वेळी बोर्डावर कार्यरत असलेले पदाधिकारी व सदस्य पुढीलप्रमाणे होते :
- अध्यक्ष : स. भूपिंदर सिंघ जी मिन्हास
- उपाध्यक्ष : स. गुरिंदर सिंघ जी बावा
- सचिव : स. रविंदर सिंघ जी बुंगई
- सदस्य : स. मनप्रीत सिंघ जी कुंजीवाले
- सदस्य : स. गुरमीत सिंघ जी महाजन
- सदस्य : स. हरपाल सिंघ जी भाटीया
- सदस्य : स. गोबिंद सिंघ जी लोंगोवाल
- सदस्य : स. परमज्योत सिंघ जी चाहल
- सदस्य : स. रघुजीत सिंघ जी विर्क
गुरुद्वारा बोर्डाच्या पुनर्स्थापनेबाबतची ही माहिती गुरुद्वारा सचखंड बोर्ड, नांदेड यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोटमध्ये देण्यात आली आहे.
— गुरुद्वारा सचखंड बोर्ड, नांदेड











