शेतकऱ्यांच्या तक्रारींची स्वतंत्र चौकशी करून पात्रांना न्याय द्या; अन्यथा मोठे जनआंदोलन उभारणार – प्रा. पंढरी पाठे व सचिन मनवर यांचा इशारा
यवतमाळ – आटमुर्डी, ता. राळेगाव, दि. २९ ऑक्टोबर २०२६ : आटमुर्डी व परिसरातील शासकीय कृषी योजनांच्या लाभार्थी निवडीतील कथित अनियमितता, रब्बी हंगामातील गहू पिकाची पडताळणी, अनुदान वितरण आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत शेतकऱ्यांनी गंभीर तक्रारी मांडल्या आहेत. मागील पाच ते सहा वर्षांतील या प्रकरणांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी आणि पात्र शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.
या संदर्भात सुबोध मेश्राम, गजानन चिडे, वीरेंद्र मेश्राम, सुदर्शन चिडे, सुनील शिवणकर, प्रशांत पेंदोर, सचिन मेश्राम, नरेंद्र कडूजी भोकरे, महेंद्र भोकरे, धनराज चिडे, प्रफुल भलमे, रमेश आत्राम, रमेश मेश्राम आणि अनिल शिवणकर यांच्यासह शेतकऱ्यांनी शेतकरी चळवळ, यवतमाळ ग्रामीणचे प्रा. पंढरी पाठे व सचिन मनवर यांच्याकडे निवेदन सादर करून आपल्या समस्या मांडल्या.
२९ ऑक्टोबरला तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट
शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी राळेगाव येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संबंधित शेतकऱ्यांच्या उपस्थितीत शेतकरी चळवळ, यवतमाळ ग्रामीणचे कार्यकर्ते तालुका कृषी अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. यावेळी निवेदन सादर करून विविध कृषी योजनांमधील कथित अनियमितता, अनुदान वितरण आणि शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे.
न्याय न मिळाल्यास जनआंदोलनाचा इशारा
शासकीय कृषी योजनांमध्ये पारदर्शकता राखणे, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे आणि शेतकऱ्यांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या प्रकरणांची गांभीर्याने दखल घेऊन तक्रारींची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी प्रा. पंढरी पाठे व सचिन मनवर यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निराकरण करून त्यांना न्याय न मिळाल्यास शेतकरी चळवळ, यवतमाळ ग्रामीणच्या वतीने मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनाने या प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका शेतकरी चळवळीने घेतली आहे.








