कर्जत येथील कार्यकर्ता मेळावा व समीक्षा बैठकीत महत्त्वाची जबाबदारी; धारूरसह बीड जिल्ह्यातील कार्यकर्त्यांकडून अभिनंदन
किल्लेधारूर (प्रतिनिधी) : किल्लेधारूर येथील सामाजिक कार्यकर्ते सनी गायसमुद्रे यांची आझाद समाज पार्टीच्या बीड जिल्हा पूर्वाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे किल्लेधारूरसह बीड जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सनी गायसमुद्रे हे गेल्या काही काळापासून धारूर तालुक्यात विविध माध्यमांतून सामाजिक कार्य करत आहेत. गोरगरीब, गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीच्या काळात मदतीसाठी धावून जाणारे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणे, गरजू नागरिकांना मदत करणे आणि वंचित घटकांच्या न्याय्य हक्कांसाठी कार्य करणे, या माध्यमातून त्यांनी परिसरात आपली ओळख निर्माण केली आहे.
आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अॅड. चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे कार्य पुढे नेण्यासाठी सनी गायसमुद्रे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मनीष दादा साठे, प्रदेश उपाध्यक्ष अरविंद कांबळे तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव व बीड जिल्हा प्रभारी डॉ. सिद्धार्थ टाकणखार यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजित कार्यकर्ता मेळावा व समीक्षा बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीला पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सनी गायसमुद्रे यांच्या निवडीमुळे बीड जिल्ह्यात पक्ष संघटनेचे काम अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यास मदत होईल, तसेच सामाजिक न्याय, समता आणि वंचित घटकांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळेल, असा विश्वास पक्ष कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी विविध स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत.











