तिवसा येथील घटना; बचाव व शोधपथकाकडून शोधमोहीम सुरू, तहसीलदार घटनास्थळी दाखल
तिवसा, ता. २८ : शेतात ओलीत करून परतत असताना कालव्याच्या कडेला पाय धुण्यासाठी गेलेला ५३ वर्षीय शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना बुधवारी (दि. २८ ऑक्टोबर) सकाळी साडेसातच्या सुमारास घडली. पिंटू ऊर्फ दिवाकर सुखदेव माहोरे (रा. तिवसा) असे वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. सायंकाळपर्यंत बचाव व शोधपथकाकडून त्यांचा शोध सुरू होता.
दिवाकर माहोरे हे रात्रीपासून शेतात ओलीत करण्यासाठी गेले होते. बुधवारी सकाळी त्यांनी शेतातील मजुराला सातरगाव येथे सोडले. त्यानंतर ते परत येत असताना हातपाय धुण्यासाठी कालव्याच्या कडेला गेले. पाय धूत असताना अचानक पाय घसरल्याने ते कालव्याच्या पाण्याच्या प्रवाहात पडले आणि खोल पाण्यात वाहून गेले.
शाळेत जाणाऱ्या मुलांनी ही घटना पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाने अमरावती येथील बचाव व शोधपथकाला पाचारण केले. पथकाने कालव्यात शोधमोहीम सुरू केली; मात्र सायंकाळपर्यंत दिवाकर माहोरे यांचा शोध लागला नव्हता. वृत्त लिहीपर्यंत शोधमोहीम सुरूच होती.
घटनास्थळी तहसीलदार डॉ. मयूर कळसे, नायब तहसीलदार नरेंद्र कुरळकर, मंडळ अधिकारी चंद्रशेखर आगरकर, तलाठी प्रकाश वाट, वैभव देशमुख, कोतवाल बाळासाहेब घुरडे, अजय खाकसे आणि आपदामित्र संदीप दहाट उपस्थित होते.
दिवाकर माहोरे यांच्याकडे चार एकर शेती असून, त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. घरातील कर्ता व्यक्ती कालव्यात वाहून गेल्याची माहिती मिळताच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.









