मोटारसायकल रॅली काढून तहसीलदारांना निवेदन; घरकुल थकबाकी अदा करण्यासह नगरपंचायतीतील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीची मागणी
श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी) : माहूर तालुक्यातील दुष्काळसदृश परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, घरकुल लाभार्थ्यांची थकीत रक्कम तातडीने अदा करावी आणि माहूर नगरपंचायतीतील विकासकामांच्या कथित गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशा विविध मागण्यांसाठी माहूर तालुका काँग्रेसच्या वतीने गुरुवार, दि. २९ ऑक्टोबर रोजी मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या वेळी घोषणाबाजी करत तहसीलदार अभिजीत जगताप यांना निवेदन देण्यात आले.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे आणि तालुकाध्यक्ष आनंद गंगाधरराव पाटील तूपदाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पक्षाच्या वतीने विविध मागण्या मांडण्यात आल्या.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी
माहूर तालुक्यातील शेतकरी दुष्काळसदृश परिस्थिती, पिकांचे नुकसान, शेतीच्या वाढत्या खर्चामुळे आणि उत्पन्नातील घट यामुळे आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे परिस्थितीचे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. तसेच पीकनुकसान भरपाई, दुष्काळी अनुदान आणि इतर लागू शासकीय मदतीचे वितरण नियमानुसार तातडीने करावे, अशीही मागणी करण्यात आली.
घरकुल लाभार्थ्यांची थकीत रक्कम अदा करा
माहूर नगरपंचायत क्षेत्रातील घरकुल योजनेच्या अंमलबजावणीतील कथित अनियमितता आणि निधी वितरणासंदर्भातील तक्रारींची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसने केली. पात्र लाभार्थ्यांच्या प्रलंबित अनुदानाची पडताळणी करून थकीत रक्कम त्यांच्या खात्यात तातडीने जमा करावी. चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी आणि शासकीय निधीचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांकडून वसुली करावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
सौरऊर्जा प्रकल्प, रस्ते आणि नाल्यांच्या कामांची चौकशी करा
माहूर नगरपंचायतीमार्फत सन २०१७ पासून करण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पांशी संबंधित मंजूर निधी, निविदा प्रक्रिया, कामांचे आदेश, प्रत्यक्ष कामाची स्थिती, देयके आणि खर्च यांची स्वतंत्र तांत्रिक व आर्थिक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच सन २०२४ पासून नगरपंचायत क्षेत्रात झालेल्या रस्ते व नाल्यांच्या बांधकामांची चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली. या कामांची अंदाजपत्रके, प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, निविदा प्रक्रिया, मोजमाप पुस्तिका, बांधकामाचा दर्जा आणि अदा केलेल्या देयकांची तपासणी करावी. निकृष्ट दर्जाचे काम किंवा आर्थिक अनियमितता आढळल्यास संबंधित कंत्राटदार, अभियंते आणि जबाबदार व्यक्तींवर नियमानुसार कारवाई करावी, अशी भूमिका काँग्रेसने मांडली.
मुख्य निवडणूक आयुक्तांबाबतच्या मागणीचाही निवेदनात समावेश
लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम राहण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या संदर्भातील आक्षेप व मागण्यांवर घटनात्मक तरतुदींनुसार निष्पक्षपणे विचार करण्यात यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. यासंदर्भातील आंदोलनकर्त्यांची भूमिका शासनापर्यंत पोहोचवावी, असे काँग्रेसच्या वतीने नमूद करण्यात आले.
तिघांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
या कार्यक्रमादरम्यान अनिल पवार नाईक, सुभाष जाधव आणि पवन सावळे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे यांनी त्यांचा सन्मान केला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे, तालुकाध्यक्ष आनंद गंगाधरराव पाटील तूपदाळे, जिल्हा उपाध्यक्ष नागराज सुलगेकर, जिल्हा सरचिटणीस अशोकराव बुटले, माजी उपनगराध्यक्ष अश्विनी आनंद तूपदाळे-पाटील यांच्यासह अमीन सय्यद, मोबीन शेख, अनिल पाटील जाधव, अनिल मडपेल्लीवार, सादिक शेख, मुसा, जयकुमार अडकिने, शरीफ शेख, विठ्ठल प्रेमसिंग राठोड, मनोज बाबुलाल जाधव, राजू सौंदलकर, राजू बोळे, माधव मुंडे, अब्दुल गफार, राजू राठोड, कारभारी शेख, जावेद, शोएबखा नबीखा, सय्यद रेहान, सलमान खान, इमरान खान, सावन चव्हाण, खाजा खान, जायद शेख, आदिल शेख, शेख तोफिक आणि शाहरुख खान यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.











