कृषी विज्ञान केंद्र, धुळे व लुपिन फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम; शेळीपालनातील आधुनिक तंत्रज्ञान, आरोग्य व्यवस्थापन व विपणनाचे मार्गदर्शन
धुळे, दि. २९ ऑक्टोबर २०२६ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, धुळे आणि लुपिन फाउंडेशन, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २७ व २८ ऑक्टोबर रोजी ‘शास्त्रीय शेळीपालन व व्यवस्थापन’ या विषयावर दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन शासकीय कृषी महाविद्यालय, धुळे येथील सभागृहात करण्यात आले. शेतकरी व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या प्रशिक्षणात शेळीपालनाचे शास्त्रीय व्यवस्थापन, पोषण, आरोग्य काळजी आणि विपणन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणाचे उद्घाटन शासकीय कृषी महाविद्यालय, धुळेचे अधिष्ठाता डॉ. राहुल देसले यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. गिरीश पाटील, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. दिनेश नांद्रे, शास्त्रज्ञ रोहित कडू, प्रियांका तेलंगे, डॉ. धनराज चौधरी, विनोद मासुळे आणि तुषार सैंदाणे उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. दिनेश नांद्रे यांनी शेतकऱ्यांनी शेळीपालन व्यवसायाकडे शास्त्रीय व व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहण्याची गरज व्यक्त केली. प्रशिक्षणातून मिळणाऱ्या तांत्रिक ज्ञानाचा प्रत्यक्ष व्यवसायात उपयोग करण्याचे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. राहुल देसले यांनी शेळीपालन हा ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांसाठी उत्पन्नाचा महत्त्वपूर्ण पूरक व्यवसाय ठरू शकतो, असे सांगितले. यासाठी योग्य पोषण, आरोग्य व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठेचे नियोजन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी डॉ. धनराज चौधरी यांनी शास्त्रीय शेळीपालन, संतुलित आहार, गोठ्याची स्वच्छता, व्यवस्थापन, रोगप्रतिबंध आणि आरोग्य काळजी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी डॉ. धनराज चौधरी आणि पशुसंवर्धन विभागाचे पशुविकास अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी शेळ्यांचे पोषण, करडांचे संगोपन, रोगप्रतिबंध आणि आरोग्य व्यवस्थापन या विषयांवर माहिती दिली. तसेच शेळी व बोकड विक्री, विपणन व्यवस्थापन आणि बाजारपेठेचे नियोजन यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणार्थींना कृषी विज्ञान केंद्रातील शेळीपालन प्रात्यक्षिक प्रकल्पाला भेट देऊन प्रकल्पाची रचना, व्यवस्थापन पद्धती आणि विविध प्रात्यक्षिकांची माहिती देण्यात आली.
समारोप कार्यक्रमाला बाजरी संशोधन केंद्र, धुळेचे प्रमुख डॉ. खुशाल बराटे, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. दिनेश नांद्रे, जगदीश काथेपुरी आणि डॉ. धनराज चौधरी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. धनराज चौधरी यांनी केले, तर आभार डॉ. पंकज पाटील यांनी मानले.
प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, धुळे आणि लुपिन फाउंडेशनच्या अधिकारी, शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.










