५२ व्या राष्ट्रीय कुमार गट कबड्डी स्पर्धेत सारंग रोकडे करणार महाराष्ट्राचे नेतृत्व; परभणी जिल्ह्यात आनंदाचे वातावरण
धारासूर, ता. गंगाखेड, जि. परभणी | प्रतिनिधी : ग्रामीण भागातील खेळाडूही राष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवू शकतात, हे धारासूर येथील सारंग रोकडे याने सिद्ध केले आहे. अमॅच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया (AKFI) मान्यताप्राप्त ५२ व्या राष्ट्रीय कुमार गट कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघाच्या कर्णधारपदी सारंग रोकडे याची निवड झाली आहे. या निवडीमुळे धारासूरसह संपूर्ण परभणी जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.
सारंग याने नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवून आपल्या खेळाची चमक दाखवली. सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे. ग्रामीण भागात मर्यादित सुविधा असतानाही महाराष्ट्र संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळवणे ही धारासूरसाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
या निवडीबद्दल युनिटी फाउंडेशन कबड्डी परिवार, परभणी आणि महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन, परभणी यांच्या वतीने सारंगचे अभिनंदन करण्यात आले. धारासूरचे ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी आणि विविध सामाजिक संघटनांकडूनही त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आगामी राष्ट्रीय स्पर्धेत सारंग महाराष्ट्र संघाला यश मिळवून देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.









