वारंवार बस बंद पडत असल्याने प्रवाशांचे हाल; घाटमार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
माथेरान
कर्जत आगारातून दररोज धावणाऱ्या कर्जत-माथेरान एसटी मिनी बसची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, या मार्गावर नवीन बस उपलब्ध करून देण्याची मागणी माथेरानमधील नागरिकांकडून होत आहे. या बससेवेचा लाभ सामान्य नागरिकांसह विद्यार्थी आणि नोकरदारांना होत असतो. मात्र, जुन्या आणि नादुरुस्त बसमुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
कर्जत-माथेरान मार्गावरील दोन्ही बसची अवस्था खराब झाली आहे. प्रवासादरम्यान वारंवार टायर पंक्चर होणे, ब्रेक निकामी होणे, दरवाजे व खिडक्या तुटलेल्या असणे, तसेच घाटमार्गातच बस बंद पडणे असे प्रकार घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास त्रासदायक बनला असून, वेळेवर इच्छित स्थळी पोहोचण्यातही अडथळे निर्माण होत आहेत.
या समस्येबाबत एसटी महामंडळाकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नसल्याचा आरोप माथेरानमधील नागरिकांनी केला आहे. कर्जत-माथेरान बसला डोंगराळ आणि वळणावळणाच्या घाटमार्गावरून प्रवास करावा लागतो. अशा परिस्थितीत बसची तांत्रिक स्थिती योग्य नसल्यास अपघाताचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
माथेरानमधील नागरिकांना दररोज या बसमधून प्रवास करावा लागतो. मात्र, नादुरुस्त बसमुळे प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. एसटी महामंडळाने या समस्येची तातडीने दखल घेऊन कर्जत-माथेरान मार्गासाठी नवीन मिनी बस उपलब्ध करून द्यावी, तसेच सध्याच्या बसची तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी माथेरानकरांकडून होत आहे.








