अकोला जिल्हाध्यक्ष वर्षाताई बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गोळेगाव येथे सुकन्या योजनेचे वितरण; आतापर्यंत ५७ लाभार्थ्यांना मदत
पातूर प्रतिनिधी
पातूर : ‘जय जवान, जय किसान’ या तत्त्वावर कार्यरत असलेल्या सैनिक शेतकरी वेल्फेअर फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सैनिक शेतकरी सुकन्या योजनेंतर्गत एका नवजात बालिकेला पाच हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. कन्याजन्माला प्रोत्साहन देणे आणि मुलींच्या भविष्यातील शिक्षणासाठी पालकांना आर्थिक आधार देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
फाऊंडेशनचे मार्गदर्शक तथा संस्थापक मनोजकुमार डांगे सर, उपाध्यक्ष निलेश निकम आणि सचिव संजय सतई यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबविण्यात येत आहे. अकोला जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य महिला सक्षमीकरण अध्यक्षा वर्षाताई संजय बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आलेगाव विभागातील गोळेगाव येथे हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी गोळेगाव येथील वंदना राजेश शितोळे यांच्या नवजात कन्येसाठी पाच हजार रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा सामाजिक संदेश देत मुलीच्या जन्माचे स्वागत करणे आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक हातभार लावणे, हा या योजनेमागील उद्देश असल्याचे फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत एकूण ५७ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
कार्यक्रमाला पातूर तालुकाध्यक्ष रवी कुमार तायडे सर, आलेगाव विभागप्रमुख प्रशांत पंजाबराव मदने, केंद्रप्रमुख, कोअर कमिटी सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोजकुमार डांगे यांच्या संकल्पनेतून ही योजना राज्यभर राबविण्यात येत असून, ग्रामीण भागात या उपक्रमाचे कौतुक होत आहे. कन्याजन्माचा सन्मान आणि मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम समाजात सकारात्मक संदेश देत आहे.











